
स्वप्नील गाडे | रिपोर्टर
मुंबई | वांद्रे (पूर्व) भागातील नागरिकांना पाण्यासाठीचा त्रास आता थांबणार आहे. आमदार वरुण सरदेसाई यांनी आपल्या आमदार निधीतून वांद्रे (पूर्व) येथील शासकीय वसाहतीत विंधन विहीर (बोअरवेल) खोदण्याच्या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. या कामाचा भूमिपूजन सोहळा येत्या रविवारी (१४ सप्टेंबर) सकाळी ११ वाजता सरदेसाई यांच्या हस्ते होणार आहे.
वांद्रेकरांनी पाण्याच्या कायमस्वरूपी तोडग्यासाठी सरदेसाई यांची भेट घेऊन मागणी केली होती. त्यानंतर त्यांनी थेट महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेत ५ एम.एल.डी. पाणीपुरवठा वाढवून घेतला. पण इतक्यावर न थांबता ‘समस्या मुळातूनच संपवायची’ या निर्धारातून सरदेसाई यांनी स्वतःच्या निधीतून बोअरवेलसाठी निधी उपलब्ध करून दिला आहे.
शासकीय वसाहतीतील सहा इमारतींना याचा थेट लाभ होणार असून, या प्रकल्पामुळे वांद्रे (पूर्व)तील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या भूमिपूजनावेळी सर्व शिवसेना पदाधिकारी उपस्थित राहणार असून, “सर्व वांद्रेकरांनी मोठ्या संख्येने या सोहळ्यास उपस्थित राहावे,” असे आवाहन शिवसेना शाखाप्रमुख अरुण कांबळे यांनी केले आहे.
पाणीटंचाईचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावल्याबद्दल रहिवाशांनी आमदार वरुण सरदेसाई यांचे आभार मानले असून, परिसरात समाधानाचे वातावरण आहे.