
पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे भव्यदिव्य पूर्णाकृती शिल्प – ‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’ – पिंपरी-चिंचवडमध्ये उभारले जात असून, या स्मारकाला अभूतपूर्व मानवंदना देण्यासाठी रविवारी (१४ सप्टेंबर) ढोल-ताशांचा ऐतिहासिक सोहळा रंगणार आहे. तब्बल तीन हजार ढोलांच्या गगनभेदी निनादाने स्मारक परिसर दणाणून जाणार आहे.
बोऱ्हाडेवाडी-मोशी येथील पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या जागेवर पिंपरी-चिंचवड महापालिका व राज्य शासनाच्या मान्यतेने हे स्मारक उभारले जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून शंभुसृष्टी साकारत आहे.
ढोल-ताशा या महाराष्ट्राच्या पारंपरिक वादन परंपरेला विशेष महत्त्व आहे. गणेशोत्सवात राज्यभर गाजणाऱ्या या पथकांनी देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. याच परंपरेचा गौरव वाढवण्यासाठी आणि शंभुराजांच्या बलिदानाला मानवंदना म्हणून ढोल-ताशा महासंघाच्या पुढाकाराने हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
मानवंदना सोहळा रविवारी दुपारी तीन वाजता मोशी येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शन केंद्रात होणार आहे. दरम्यान, येत्या २ ऑक्टोबरला छत्रपती संभाजी महाराजांच्या पूर्णाकृती शिल्पाच्या तलवारीचे शस्त्रपूजन पार पडणार असल्याचे हिंदुभूषण स्मारक ट्रस्टचे उपाध्यक्ष गणेश भुजबळ यांनी सांगितले.