
नगर प्रतिनिधी
नगरमध्ये सुनेने वृद्ध सासूला केलेल्या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून, यामुळे समाजात संतापाची लाट उसळली आहे. सासू-सुनेतील किरकोळ वादाचा हा प्रकार हिंसक वळण घेतल्यामुळे घरगुती हिंसाचाराचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
व्हिडिओमध्ये वृद्ध महिला ‘मला मारू नकोस’ अशी आर्त विनंती करताना दिसत आहे; मात्र सून तिच्याकडे दुर्लक्ष करून तिच्या हाताला पिळवटून बेदम मारहाण करत असल्याचं स्पष्टपणे पाहायला मिळतं. हे दृश्य पाहून नेटकरी संतप्त झाले असून, संबंधित महिलेवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
हा व्हिडिओ nagarcity24 या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला असून, आतापर्यंत तब्बल ३ लाख ५३ हजारांहून अधिक लोकांनी तो पाहिला आहे. घटनेमागील नेमका वाद काय होता, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, सुनेच्या या अमानुष कृत्यावर नेटकऱ्यांनी तीव्र प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.
“सून मारहाण करत असताना मुलगा कुठे होता? आईला वाचवण्याऐवजी तो गप्प का?” असा सवाल अनेकांनी उपस्थित केला आहे. तर, “कर्म फिरून परत येईल; तुझी सून तुला याहून अधिक मारेल,” अशा स्वरूपाचा इशाराही काहींनी दिला आहे.
या घटनेमुळे सासू–सुनांचे वाद केवळ वादापुरते न राहता थेट हिंसाचारात परिवर्तित होऊ लागल्याची चिंता व्यक्त होत आहे. समाजमाध्यमांवरून व्यक्त होणारा रोष लक्षात घेता, स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी या प्रकरणी पुढील काय कारवाई करणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.