
सातारा:प्रतिनिधी
श्री.छ. शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचे साम्राज्यात रुपांतर करणाऱ्या, शाहूनगरी वसवणाऱ्या श्री.छ. शाहू महाराज (थोरले) यांचा इतिहास त्या मानाने दुर्लक्षित राहिला आहे. परंतु यापुढील काळात त्यांचा इतिहास, त्यांचे कार्य पुढील पिढीपर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्न केला जाईल. संगममाहुली येथे राजघाटाचे पुर्ननिर्माण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिले.
ते संगममाहुली येथे छत्रपती शाहू महाराज (थोरले) यांच्या समाधीस मावळा फौंडेशन आणि विविध संस्थांनी आयोजित केलेल्या अभिवादन प्रसंगी बोलत होते. यावेळी मावळा फौंडेशनचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी, ज्येष्ठ पत्रकार हरिष पाटणे, जनता बँकेचे चेअरमन अमोल मोहिते, जनता बँकेचे सीईओ अनिल जठार, जिल्हा बँकेच्या संचालिका कांचनताई साळुंखे, कामेश कांबळे, रवींद्र झुटींग, राजुशेठ राजपुरोहित, अजय जाधवराव, संगममाहुलीचे सरपंच प्रवीण शिंदे, उपसरपंच अविनाश कोळपे, जयहिंद मंडळाचे अध्यक्ष प्रदीप वाघमळे, क्षेत्रमाहुली, सोनगाव ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, ग्रामस्थ आणि मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना उपस्थितांच्यावतीने श्रध्दांजली वाहण्यात आली. मंत्री शिवेंद्रसिंहराजे पुढे म्हणाले, श्री.छ. शाहू महाराज (थोरले) यांनी शाहूनगरी वसवली तिला मराठ्यांची राजधानी केली परंतु त्यांच्या इतिहासाबाबत फारसे लिहिले नाही किंवा त्यांच्या कार्याबद्दल फारसे सांगितले गेले नाही. साताऱ्यात त्यांच्या आठवणी, स्मृतीच्या खुणा नाहीत ही दु:खद गोष्ट आहे परंतु यापुढे त्यांच्या कार्याबद्दल माहिती व्हावी यासाठी मावळा फौंडेशनच्या सहकार्याने प्रयत्न करणार आहे. लवकर नगरपालिकेच्या नूतन इमारतीच्या आवारात त्यांच्या पुतळा बसवण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. काळाच्या ओघात नदीचे पात्र बदलले असून याठिकाणी अनेक गोष्टी बदलल्या आहेत. तरी योग्य समन्वय साधून राजघाटाचे पुर्ननिर्माण करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. शाहू महाराज (थोरले) यांचे योगदान पुढील पिढीला कळण्यासाठी योग्य ते प्रयत्न केले जातील असे आश्वासनही मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिले.
याप्रसंगी मावळा फौंडेशनचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी श्री.छ. शाहू महाराज (थोरले) यांचा इतिहास, कार्य सांगत राजघाटाचे पुर्ननिर्माण करण्यासाठी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी प्रयत्न करावेत अशी मागणी केली. यापुढील काळात सातारा, पुणे, दिल्ली येथे श्री.छ. शाहू महाराज (थोरले)यांची जयंती आणि पुण्यतिथी मावळा फौंडेशन आणि विविध संस्थांच्यावतीने करण्यात येईल. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे अभिवादन कार्यक्रम साध्या पध्दतीने घेण्यात आला. तसेच इतर सत्कार समारंभ रद्द करुन पुढील काळात पुन्हा सत्कार समारंभ घेण्यात येईल असेही श्री. कुलकर्णी यांनी सांगितले.
प्रारंभी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि विविध मान्यवर, ग्रामस्थांच्या वतीने श्री.छ. शाहू महाराज (थोरले) यांच्या समाधीस्थळी अभिवादन करण्यात आले. सूत्रसंचालन नंदकुमार सावंत यांनी तर आभार अजित साळुंखे यांनी मानले. यावेळी वजीर नदाफ, अमर बेंद्रे, रवी माने, चंद्रकांत सणस, योगेश शिंदे, संजय माने, सतीश ओतारी, अभिजित बारटक्के, तुषार महामूलकर, सचिन सावंत, क्षेत्रमाहुलीचे पोपटराव जाधव, सोनगावचे प्रभाकर शिंदे, योगेश सुर्यवंशी, प्रशांत कुलकर्णी, जयहिंद मंडळ ५०१ पाटीचे पदाधिकारी, मावळा फौंडेशनचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.