
पुणे प्रतिनिधी
आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या २३४ व्या जयंतीनिमित्त पुरंदर तालुक्यातील भिवडी येथे झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रामोशी-बेडर समाजासाठी महत्त्वाची घोषणा केली.
मुख्यमंत्री म्हणाले की, या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाने दोन लाख रुपयांपर्यंतचे बिगर तारण कर्ज, तसेच उद्योग-व्यवसायासाठी १५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षण, प्रशिक्षण आणि पोलिस भरतीसाठीही विशेष योजना राबवल्या जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
उमाजी नाईकांविषयी बोलताना फडणवीस म्हणाले, “इंग्रजांविरुद्ध संघर्षाची पहिली ठिणगी उमाजी नाईक यांनी पेटवली. शिवरायांच्या मावळ्यांप्रमाणे गनिमी काव्याच्या बळावर त्यांनी ब्रिटिशांना धडा शिकवला. इंग्रजांनी त्यांना फाशी दिली, तरी समाज स्वातंत्र्यलढ्यात मागे राहिला नाही.”
कार्यक्रमात माजी मंत्री गिरीश बापट यांच्यासह अनेक नेत्यांना मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कार देण्यात आले. आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुरंदर येथे उमाजी नाईकांचे स्मारक उभारण्यात येणार असल्याचे सांगितले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्मृतीस्थळाला पुष्पचक्र अर्पण करून उमाजी नाईकांना अभिवादन केले.