
मुंबई प्रतिनिधी
मुंबईतील प्रवाशांचा प्रवास वेळेत, आरामदायी आणि परवडणारा करण्यासाठी बेस्ट उपक्रमाने नवा वातानुकूलित बसमार्ग सुरू करण्याची घोषणा केली आहे. ‘ए-८४’ असा क्रमांक असलेली ही बस सेवा रविवार, ७ सप्टेंबरपासून सुरु होत असून, डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी चौक (संग्रहालय) ते ओशिवरा बस आगार या मार्गावर धावणार आहे.
विशेष म्हणजे, हा मार्ग स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सागरी किनारी मार्गाने (कोस्टल रोड) जाणार आहे. खासगी ॲपआधारित टॅक्सीने याच अंतरासाठी ५०० ते ७०० रुपये मोजावे लागत असताना, बेस्टच्या या एसी बसमधून प्रवास केवळ ५० रुपयांत करता येणार आहे.
प्रवाशांचा वेळ वाचणार
दक्षिण मुंबई व पश्चिम उपनगर यांना सागरी किनारी मार्गाने जोडल्यामुळे प्रवासाचा कालावधी लक्षणीयरीत्या कमी होईल. या मार्गावर संग्रहालय, चर्चगेट, वरळी सी फेस, शिवाजी पार्क, माहीम, खार, सांताक्रूझ, विर्ले पार्ले, अंधेरी आणि ओशिवरा यांसारखी महत्त्वाची ठिकाणे येतात. त्यामुळे दैनंदिन प्रवासी आणि पर्यटक या दोघांसाठी ही सेवा सोयीस्कर ठरणार आहे.
बसची वेळ
ओशिवरा आगारातून पहिली बस सकाळी ७.१५ वाजता सुटेल, तर शेवटची बस सायंकाळी ५.२० वाजता सुटेल. डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी चौक येथून पहिली बस सकाळी ८.५० वाजता सुटेल, तर शेवटची बस सायंकाळी ७.१५ वाजता सुटेल. दिवसभर या बस ४० ते ४५ मिनिटांच्या अंतराने धावणार आहेत.
परवडणारी भाडे रचना
या बससाठी किमान भाडे १५ रुपये आणि कमाल भाडे ५० रुपये निश्चित करण्यात आले आहे. आठवड्याच्या सातही दिवसांत ही सेवा सुरू राहील.
पर्यटकांसाठी वेगळा अनुभव
बेस्टच्या ताफ्यात नव्याने दाखल झालेल्या वातानुकूलित बसगाड्यांमधून प्रवासाचा आनंद प्रवाशांना घेता येणार आहे. नव्याने विकसित कोस्टल रोडवरून प्रवास करण्याची ही पहिलीच सार्वजनिक सुविधा असल्याने पर्यटकांनाही एक वेगळा अनुभव मिळणार आहे, असे बेस्टच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.