
नवी मुंबई प्रतिनिधी
गणेशोत्सवाच्या उत्सवमूर्तींच्या विसर्जनावेळी मुंबईत भाविकांचा प्रचंड ओघ उशिरापर्यंत सुरू राहतो. या पार्श्वभूमीवर भाविकांच्या परतीच्या प्रवासासाठी सुरक्षित आणि सोयीस्कर सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मध्य रेल्वेकडून विशेष नियोजन करण्यात आले आहे.
६ ते ७ सप्टेंबरच्या (शनिवार/रविवार) मध्यरात्री हार्बर मार्गावर सीएसएमटी ते पनवेलदरम्यान दोन विशेष लोकल गाड्या धावणार असल्याची घोषणा मध्य रेल्वेने केली आहे.
पहिली गाडी पहाटे १.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून सुटून २.५० वाजता पनवेलला पोहोचेल. दुसरी गाडी पहाटे २.४५ वाजता सीएसएमटीहून सुटून ४.०५ वाजता पनवेलला पोहोचेल.
याउलट पनवेलहून सीएसएमटीकडेही दोन गाड्या धावणार आहेत. १.०० वाजता पनवेलहून सुटणारी गाडी २.२० वाजता सीएसएमटीला दाखल होईल, तर १.४५ वाजता सुटणारी दुसरी गाडी पहाटे ३.०५ वाजता सीएसएमटीला पोहोचेल.
ठाणे-वाशी ट्रान्स हार्बर मार्गाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती रेल्वेकडून देण्यात आलेली नाही. मात्र, ४/५, ५/६ आणि ६/७ सप्टेंबर रोजी सीएसएमटी ते कल्याण/ठाणे या मुख्य मार्गावरही मध्यरात्री विशेष लोकल धावणार आहेत.
विसर्जनाच्या दिवशी रस्त्यांवर होणाऱ्या वाहतूककोंडीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना या विशेष गाड्यांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. गणेशोत्सवातील प्रचंड गर्दी हाताळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने केलेली ही व्यवस्था भाविकांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे.