
सोलापूर प्रतिनिधी
‘हॉटेल मटण भाकरी’च्या नावाखाली सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी टाकलेल्या धाडीत तब्बल २ कोटी ६८ लाख ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सोलापूर जिल्ह्यातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई ठरली आहे.
सांगोला तालुक्यातील सोनंद येथे सिमेंट पत्र्याच्या खोलीत सुरू असलेल्या या अड्ड्यावर सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्या पथकाने धाड टाकली. या वेळी सचिन साहेबराव काशीद (रा. सोनंद, ता. सांगोला) व शंभुलिंग प्रकाश तेरदाळ (रा. आथणी, जि. बेळगाव) हे जुगार क्लब चालवताना पोलिसांच्या तावडीत सापडले.
कारवाईत पोलिसांनी १६ लाख ९ हजार रुपयांची रोख रक्कम, ६२ मोबाईल, २६ चारचाकी वाहने, ६१ दुचाकी वाहने, तसेच देशी व विदेशी दारू असा प्रचंड मुद्देमाल ताब्यात घेतला. एकाच वेळी ५० जुगार खेळणाऱ्यांवर महाराष्ट्र जुगार कायदा अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
या धाडीत पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली भारत भोसले, अनिल पाटील, दत्तात्रय तोंडले, निलेश डोंगरे, मंगेश रोकडे, संतोष गायकवाड, शितल चव्हाण, राहुल लोंढे व निलेश रोंगे या पोलिसांनी सहभाग नोंदवला.
या कारवाईमुळे सोलापूर जिल्ह्यात खळबळ उडाली असून, ‘हॉटेल मटण भाकरी’च्या आडून सुरु असलेल्या या जुगार साम्राज्याचा पर्दाफाश झाला आहे.