
सोलापूर प्रतिनिधी
स्वातंत्र्य दिनी शाळेच्या कार्यक्रमाला गेलेली इयत्ता आठवीतील विद्यार्थिनी परत घरी न आल्याने कुटुंबीयांसह पोलिसांची चांगलीच धावपळ झाली. अखेर फौजदार चावडी पोलिसांनी अवघ्या २४ तासांत कराडमधून विद्यार्थिनीला शोधून काढत तिचे अपहरण करणाऱ्या १९ वर्षीय तरुणाला अटक केली.
सिद्राम बुक्का (वय १९, रा. कुंभारी, ता. दक्षिण सोलापूर) असे अटक झालेल्या तरुणाचे नाव असून त्याच्याविरुद्ध अपहरण आणि ‘पोक्सो’ कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सकाळी शाळेत गेली; घरी परतलीच नाही
१५ ऑगस्ट रोजी सकाळी साडेसहा वाजता ती विद्यार्थिनी स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमासाठी घरातून बाहेर पडली होती. मात्र दुपारपर्यंत परत न आल्याने आईने शोधाशोध केली, मैत्रिणींकडे विचारपूस केली. काहीही माहिती मिळाली नाही तेव्हा आईने थेट फौजदार चावडी पोलीस ठाण्यात धाव घेतली.
सीसीटीव्हीतून धागा, पोलिसांचा पाठलाग
फिर्यादीनंतर पोलिसांनी शाळा ते एस.टी. स्टॅण्डपर्यंतचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात एक तरुण दुचाकीवरून मुलीला मोहोळच्या दिशेने नेत असल्याचे दिसले. चौकशीत संशयित कराडला गेल्याची माहिती मिळाली.
कराडमध्ये सापडली विद्यार्थिनी
सिद्रामची बहीण कराड येथे असल्याचा तपासात उलगडा झाला. पोलिसांनी त्याच्या भावजीचा क्रमांक मिळवून सायबर पोलिसांच्या मदतीने लोकेशन शोधले. तेथे पोहोचल्यावर मुलगी घरी आढळली. मात्र सिद्राम बाहेर होता. पोलिसांनी विद्यार्थिनीला सुरक्षित ताब्यात घेतले आणि घरच्यांचे मोबाईल जप्त करून थांबले. काही वेळाने सिद्राम बहिणीच्या घरी परतला आणि पोलिसांनी त्यालाही अटक केली.
सोलापूर पोलिसांच्या या जलद कारवाईमुळे अल्पवयीन मुलीची सुखरूप सुटका झाली असून आरोपीविरुद्ध कठोर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.