
जळगाव प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठ्या कृषी उत्पन्न बाजार समितीवर अखेर ठाकरे गटाने वर्चस्व प्रस्थापित केले असून महायुतीला केवळ उपसभापतीपदावर समाधान मानावे लागले आहे. या निकालामुळे जळगावच्या राजकारणात महत्त्वाचे समीकरण बदलले असल्याचे स्पष्ट झाले आहे.
एका वर्षासाठी संधी देण्याचे ठरूनही दोन वर्ष उलटूनही पदाचा राजीनामा न दिल्याने विद्यमान सभापतींविरोधात १४ संचालकांनी अविश्वास ठराव दाखल केला होता. नामुष्की टाळण्यासाठी सभापती आणि उपसभापती या दोघांनी राजीनामे दिल्यानंतर शुक्रवारी झालेल्या नव्या निवडणुकीत ठाकरे गटाचे सुनील महाजन सभापती म्हणून निवडून आले. उपसभापतीपदावर राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) गोकुळ चव्हाण बिनविरोध निवडले गेले.
सभापतीपदासाठी झालेल्या थेट लढतीत सुनील महाजन यांनी १५ मते मिळवत विजय मिळवला, तर महायुतीचे लक्ष्मण पाटील यांना अवघी दोनच मते मिळाली. विशेष म्हणजे महाजन यांना मिळालेल्या बहुमतात महायुतीतील संचालकांचाही पाठिंबा असल्याचे बोलले जाते. परिणामी, बहुमत असूनही महायुतीला बाजार समितीची सत्ता ताब्यात घेता आली नाही.
सुनील महाजन हे जळगाव महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते आणि माजी महापौर जयश्री महाजन यांचे पती आहेत. त्यांच्या विजयाचा आनंद व्यक्त करताना समर्थकांनी गुलाल उधळून ढोलताशांच्या गजरात जल्लोष केला. सभापती म्हणून निवड झाल्यानंतर महाजन यांनी वसुली वाढवून शेतकरी आणि कर्मचाऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्याची ग्वाही दिली. तसेच, माजी मंत्री सुरेश जैन यांच्या कार्यकर्त्याला बाजार समितीच्या सभापतीपदी बसण्याचा आज ऐतिहासिक क्षण असल्याचे त्यांनी नमूद केले.
मुळात सहकार क्षेत्रात राजकारणाला स्थान नसल्याचा दावा करत महाजन यांनी या पॅनेलचे स्वरूप सर्वपक्षीय असल्याचे स्पष्ट केले. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील तिन्ही मंत्र्यांचे आभार मानले.
जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत पूर्वी महाविकास आघाडीने १८ पैकी ११ जागा जिंकून शिंदे गटाला धक्का दिला होता. त्यानंतर महायुतीची पकड हळूहळू सैलावत गेल्याचे या ताज्या निकालातून दिसून आले.