
जळगाव प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील कसबा पिंप्री गावात माणुसकीला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. पित्यानेच आपल्या २५ वर्षीय पोटच्या मुलाचा निर्घृण खून केला. या कृत्यात भावासह काकाचाही सहभाग उघडकीस आला असून, फत्तेपूर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
मृत युवकाचे नाव शुभम धनराज सुरळकर असे असून, त्याला त्याच्या वडिलांनी धनराज सुपडू सुरळकर घरात झोपेत असताना डोक्यात दगड घालून ठार मारले. पोलिस तपासात उघड झाल्याप्रमाणे, या कृत्यात शुभमचा भाऊ गौरव सुरळकर आणि काका हरिलाल सुरळकर यांनीही मदत केली.
दारूच्या व्यसनामुळे कुटुंब उद्ध्वस्त
शुभमला दारूचे अतिव्यसन होते. सतत नशेत राहणं, किरकोळ कारणांवरून घरात राडा करणं आणि कुटुंबीयांना मारहाण करणं हे त्याचे नित्याचे झाले होते. या सततच्या त्रासाला कंटाळून वडिलांचा संयम सुटला आणि त्यांनी झोपेत असलेल्या शुभमच्या डोक्यात मोठा दगड घालून त्याचा जीव घेतला.
मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न
खून केल्यानंतर मृतदेह गावापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर रस्त्याच्या कडेला टाकण्यात आला. यानंतर गावात खळबळ उडाली आणि पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. प्राथमिक चौकशीत धनराज सुरळकर यांनी गुन्ह्याची कबुली दिली. पुढील तपासात गौरव आणि हरिलाल यांचाही सहभाग स्पष्ट झाला.
गावात शोककळा, पुढील तपास सुरु
या घटनेमुळे संपूर्ण कसबा पिंप्री गावात हळहळ व्यक्त होत आहे. व्यसनाच्या विळख्यातून सुरु झालेला कुटुंबीयांचा संघर्ष अखेर खून आणि कारावासाच्या रूपाने संपला. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, आरोपींवर कठोर कारवाई केली जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.