
जळगाव प्रतिनिधी
वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर महाराष्ट्र अजून सावरलेलंच नाही, तोवर जळगाव जिल्ह्यातील मयुरी ठोसर प्रकरणाने पुन्हा एकदा राज्य हादरले आहे. हुंडा आणि अंधश्रद्धेच्या छळाचा बळी ठरलेल्या मयुरीनं अवघ्या चार महिन्यांत वैवाहिक जीवन संपवले.
चार महिन्यांत संपलेले आयुष्य
मयुरी ठोसर (वय 23) हिचा विवाह 10 मे 2025 रोजी गौरव ठोसर याच्याशी झाला होता. सुंदर मोतीनगर येथे ती सासरच्यांसोबत राहत होती. मेडिकल स्टोअर सुरू करण्याचे स्वप्न तिने मनाशी बाळगले होते. पण त्यासाठी माहेरहून 10 लाख रुपये आणण्याची मागणी करण्यात येत असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी, 14 सप्टेंबर रोजी मयुरीनं गळफास घेत आत्महत्या केली. या टोकाच्या निर्णयामागे तिच्यावर झालेला छळ आणि मानसिक दबावच कारणीभूत असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
‘आसाराम बापूंना गुरु कर’
मयुरीच्या भावाने धक्कादायक आरोप केला. त्यानुसार, मयुरीची सासू तिला वारंवार “आसाराम बापूंची सेवा कर, त्यांना गुरु मान” असा दबाव टाकत असे. त्याचबरोबर मयुरीच्या मोठ्या घटस्फोटित दीराने तिच्यासोबत अश्लील वर्तन केल्याचा आरोपही कुटुंबीयांनी केला आहे.
हातावरचे चटके, पण मौन
मयुरी घरी आली असता तिच्या हातावर चटके असल्याचे आई-वडिलांनी पाहिले. चौकशी केली असता तिने “काम करताना भाजले” एवढेच सांगितले. मात्र वारंवार दिसणारे चटके तिच्या छळाची साक्ष देत होते, असे नंतर नातेवाईकांनी सांगितले.
तीन बैठका, पण छळ कायम
लग्नानंतर अवघ्या चार महिन्यांत तिनवेळा मयुरी, तिचा नवरा आणि सासरच्यांची बैठक झाली. प्रत्येक वेळी “आता नीट वागू” अशी आश्वासने दिली गेली, पण घरी परतल्यावर छळ सुरुच राहिला, असे आईने सांगितले. लग्नावेळीच पाच लाख रुपये दिल्यानंतरही नवनवीन मागण्या करण्यात आल्या.
बहिणीचा धक्का
मयुरीची थोरली बहीण नेहा ठोसर हिने सांगितले की, मृत्यूपूर्वी काही तास आधी मयुरीशी तिचे आनंदात बोलणे झाले होते. संध्याकाळी अचानक मृत्यूची बातमी मिळाल्याने संपूर्ण कुटुंब हादरले.
वैष्णवी नंतर मयुरी, पुन्हा हादरला महाराष्ट्र
वैष्णवी हगवणे प्रकरणातील न्यायाची लढाई अजून सुरू असतानाच मयुरी ठोसर प्रकरण समोर आले आहे. हुंडा आणि छळाच्या सावटाखाली पुन्हा एकदा तरुणीचा बळी गेला आहे. मयुरीच्या आई-वडिलांनी तिच्या मृत्यूला जबाबदार सासरच्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.