
सातारा प्रतिनिधी
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या गट-गणांची रचना अंतिम टप्प्यात आली असून, आता सर्वांचे लक्ष आरक्षण सोडतीकडे लागले आहे. येत्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी होणाऱ्या या सोडतीनंतरच इच्छुक उमेदवारांच्या राजकीय समीकरणांना आकार येणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाने यासाठी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या असून, अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्ग (ओबीसी) तसेच महिलांसाठी राखीव जागांचे वाटप निश्चित पद्धतीनुसार करण्यात येणार आहे. या प्रक्रियेत ‘चक्रानुक्रम’ पद्धती अवलंबली जाणार असून, प्रत्येक गट-गणात लोकसंख्येच्या प्रमाणावर आधारित आरक्षणाचे वाटप होईल.
सोडत कशी काढली जाणार?
आरक्षण ठरविण्याचा अधिकार निवडणूक आयोगाकडे असून, जिल्हाधिकारी किंवा त्यांच्या नियुक्त अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही सोडत काढली जाणार आहे. तहसीलदारांपेक्षा कनिष्ठ दर्जाचा अधिकारी यासाठी नियुक्त केला जाणार नाही, अशी स्पष्ट तरतूद आहे.
अनुसूचित जाती व जमातींच्या जागा त्या-त्या गटात असलेल्या लोकसंख्येच्या प्रमाणानुसार निश्चित होतात. ज्या गटात या प्रवर्गाची लोकसंख्या जास्त आहे, त्याठिकाणी प्रथम आरक्षण दिले जाईल. त्यानंतर घटत्या क्रमाने उर्वरित जागांचे वाटप होईल. ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षण मात्र लॉटरी पद्धतीने ठरवले जाईल. मात्र, ज्या गटांना आधीच अनुसूचित जाती-जमातीचे आरक्षण मिळाले आहे, ते गट ओबीसी आरक्षणातून वगळले जातील.
महिलांसाठी राखीव जागा
या वेळी महिलांसाठी स्वतंत्रपणे चिठ्ठ्या काढून काही जागा निश्चित केल्या जाणार आहेत. म्हणजेच एससी, एसटी आणि ओबीसी प्रवर्गात असलेल्या आरक्षित जागांपैकी ठरावीक जागा महिलांसाठी निश्चित होतील. यामुळे ग्रामीण भागातील महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नेतृत्वाची संधी मिळणार आहे.
फिरते आरक्षण कायम
ज्या गट-गणाला या सार्वत्रिक निवडणुकीत आरक्षण मिळेल, त्याच प्रवर्गाचे आरक्षण पुढील निवडणुकीत कायम राहणार नाही. फिरत्या आरक्षणाच्या पद्धतीनुसार पुढच्या निवडणुकीत इतर गटांना त्या प्रवर्गाचे आरक्षण दिले जाईल. त्यामुळे दीर्घकालीन दृष्टीने सर्व गटांना संतुलित प्रतिनिधित्व मिळेल.
इच्छुकांची उत्सुकता शिगेला
सातारा जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमध्ये स्थानिक राजकारणावर थेट परिणाम करणाऱ्या या आरक्षण सोडतीकडे इच्छुक उमेदवार व समर्थकांचे डोळे लागले आहेत. आपल्या सोयीचे आरक्षण पडावे यासाठी राजकीय हालचाली सुरू असून, अनेकांनी देव पाण्यात घालायला सुरुवात केली आहे.