
सातारा प्रतिनिधी
फलटण तालुक्यातील जावली गावचा सुपुत्र, भारतीय सैन्यदलातील जवान देवदास दिलीप रजपूत (वय ३५) यांचे राजस्थानमधील नासेराबाद येथे कर्तव्य बजावत असतानाच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या आकस्मिक जाण्याने जावलीसह संपूर्ण सातारा जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.
२०१६ मध्ये नर्सिंग असिस्टंट पदावर भारतीय सैन्यात भरती झाल्यानंतर त्यांनी लखनऊ येथे प्राथमिक प्रशिक्षण पूर्ण केले. त्यांचे पहिले पोस्टिंग जम्मू येथे झाले. त्यानंतर पुण्यातील सशस्त्र वैद्यकीय रुग्णालयात काही काळ सेवा बजावल्यानंतर सध्या ते नासेराबाद (राजस्थान) येथे कार्यरत होते.
कर्तव्यावर असताना अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना हृदयविकाराचा झटका आला. उपचार सुरू करण्याआधीच त्यांचे निधन झाले.
त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले व दोन भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या मृत्यूने गावात शोककळा पसरली असून ‘सेवेत असतानाच वीरमरण आलेल्या जवानाचा आम्हाला अभिमान आहे’ अशा भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या.