
बीड प्रतिनिधी
बीड शहरात गुरुवारी सकाळी एका होमगार्ड महिलेचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. शिवाजीनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेपत्ता झालेल्या आयोध्या राहुल व्हरकटे (वय २७, रा. बीड) हिचा खून झाल्याचे प्राथमिक चौकशीत उघड झाले आहे.
काही दिवसांपूर्वी आयोध्या व्हरकटे हरवल्याची तक्रार तिच्या कुटुंबीयांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल केली होती. गुरुवारी सकाळी तालुक्यातील पांगरी गावाजवळील नाल्यात तिचा मृतदेह सापडला. त्यानंतर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
चौकशीदरम्यान वृंदावनी खरसाडे (वय ३५, रा. गिरामनगर, बीड) हिने आयोध्या व्हरकटेचा खून केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. मृत आणि आरोपी महिला एकाच गावच्या रहिवासी असून, सध्या गिरामनगर भागात वास्तव्यास होत्या. मात्र खुनामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्राथमिक तपासात वैयक्तिक वादातून ही घटना घडल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
या घटनेमुळे बीड शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, होमगार्ड दलातही मोठी खळबळ उडाली आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.