
बीड प्रतिनिधी
डोंगराळ भाग, मुरमाड जमीन, पावसावर आणि हंगामी शेतीवर गुजराण… तरीही आई–वडिलांनी कष्टाने शिकवलेली लेकरं आता गावाचं नाव दूरवर झळकवत आहेत. अंबाजोगाई तालुक्यातील वरवटी या छोट्याशा गावाने यंदा अक्षरशः वीज विभागात “सोनं पेरलं” आहे. महावितरण आणि महापारेषण या ऊर्जा विभागाच्या दोन महत्त्वाच्या कंपन्यांमध्ये गावातील तब्बल १० तरुणांची विद्युत सहायक व विद्युत तंत्रज्ञ पदांवर निवड झाली असून, यात एका पती–पत्नीचाही समावेश आहे.
वरवटीची चमकदार यादी
पावणेतीन हजार लोकसंख्येच्या वरवटी गावातील विशाल गोविंद मुंडे, मनीषा लक्ष्मण सोळंके, सुनीता हरिभाऊ मुंडे, प्रतीक्षा वैजिनाथ चाटे, वैष्णवी बंकट चाटे आणि अनिता माणिक चाटे या सहा जणांची महावितरणमध्ये विद्युत सहायक म्हणून निवड झाली. तर महापारेषणमध्ये शुभांगी राजाभाऊ नागरगोजे, लक्ष्मण देविदास सोळंके, सिद्धेश्वर दशरथ मुंडे आणि गणेश बब्रुवार चाटे यांची विद्युत तंत्रज्ञ पदावर निवड झाली.
दांपत्याची दुहेरी कमान
विशेष म्हणजे पंधरवड्यापूर्वीच लक्ष्मण सोळंके यांची महापारेषणमध्ये निवड झाली होती, आणि आता त्यांच्या पत्नी मनीषा सोळंके यांनी महावितरणमध्ये प्रवेश केला आहे. तसंच वैष्णवी चाटे यांच्या वडिलांचे निधन झाले असून, तीन बहिणी आणि लहान भावाचा सांभाळ एकट्या आईने केला. ‘आधार माणुसकीचा’ संस्थेचे अॅड. संतोष पवार यांनी त्यांच्या शिक्षणासाठी हातभार लावला.
वंजारवाडीचीही विजयी झेप
यशाच्या या लाटेत बीड तालुक्यातील आदर्श गाव वंजारवाडीही मागे राहिले नाही. गावातील सहा जणांची महावितरणमध्ये, तर चौघांची महापारेषणमध्ये निवड झाली. यात मोहन मोहन कुटे, कृष्णा संतराम मोराळे, प्रदीप साहिनाथ खाडे, शुभांगी विठ्ठल खाडे, विजय सोपान वनवे, उमेश अर्जुन शेंडगे आणि माया गणेश मिसाळ यांचा समावेश आहे. या गुणवंतांचा सत्कार वैजिनाथ तांदळे यांच्या उपस्थितीत गावातील मंदिरात करण्यात आला.
वरवटी आणि वंजारवाडीच्या या तरुणांनी मेहनत, चिकाटी आणि शिक्षणाच्या जोरावर दाखवून दिलं की, संधी मिळाली तर गावाकडचं तारुण्य काहीही साध्य करू शकतं.