
स्वप्नील गाडे| रिपोर्टर
मुंबई | मुंबईच्या सुरक्षिततेसाठी जीव धोक्यात घालून झटणारे पोलीस कर्मचारी मात्र त्यांच्या राहत्या क्वार्टर्समध्येच सुरक्षित नाहीत, ही बाब धक्कादायक आहे,” असे मत महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेने व्यक्त केले आहे.
१७ ऑगस्ट रोजी पहाटे दोनच्या सुमारास अंधेरी (पश्चिम) येथील डी.एन. नगर पोलीस अधिकारी वसाहतीतील इमारत क्र. ८ मधील सदनिका क्र. १४५ (पहिला मजला) येथे स्लॅब कोसळून तीन लहान मुले जखमी झाली. या घटनेने वसाहतीतील सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना मोठा मानसिक धक्का बसला. सुदैवाने जीवितहानी झाली नाही.
यापूर्वी देखील या वसाहतीत अशाच घटना घडल्या असून त्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र त्यावर केवळ दिखाऊ दुरुस्ती करून निकृष्ट दर्जाच्या ‘थुकपट्टी’च्या कामांवर पांघरूण घातले गेले, असा आरोप संघटनेने केला आहे.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेमार्फत डी.एन. नगर पोलीस ठाण्यात निवेदन देऊन भ्रष्टाचारी ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. यासाठी मुंबई अध्यक्ष तसेच कोकण विभाग संपर्क प्रमुख. रितेश सुनिल गोसावी यांच्या नेतृत्वाखालील पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मचिदर, पोलीस निरीक्षक संतोष चौधरी व विभागीय सहाय्यक पोलीस आयुक्त. कल्पना गाडेकर यांची भेट घेतली.
“पोलिसांच्या सुरक्षेला धोका पोहोचविणारे निष्कृष्ट दर्जाचे बांधकाम करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी व ठेकेदारांवर तातडीने गुन्हा दाखल झाला पाहिजे. अन्यथा संघटना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल,” असा इशारा यावेळी देण्यात आला.
डी.एन. नगर वसाहतीतील या घटनेमुळे पोलीस कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई होणे अत्यावश्यक असल्याचे संघटनेचे मत आहे.