
मुंबई प्रतिनिधी
मुंबई : शहरावर पुन्हा एकदा पावसाने कहर केला असून गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार सरींमुळे रस्ते, गल्लीबोळ आणि रेल्वेमार्ग जलमय झाले आहेत. पाण्याच्या प्रचंड साचल्यामुळे ठिकठिकाणी वाहतूक ठप्प झाली असून सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान खात्याने मुंबईसाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला असून पुढील काही तास पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
भारतीय हवामान विभागाच्या प्रादेशिक केंद्राकडून प्राप्त माहितीनुसार, राज्यात १६ ते २१ ऑगस्टदरम्यान अतिवृष्टीसह वादळी वाऱ्यांचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य आपत्कालीन कार्यकेंद्राने सर्व यंत्रणांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
संभाव्य पर्जन्यमान
* कोकण व मध्य महाराष्ट्र : घाट परिसरात काही ठिकाणी अतिवृष्टी ते अत्यंत अतिवृष्टीची शक्यता.
* मराठवाडा : काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज. वीजांचा कडकडाट, विजांचा कडकडाट, तसेच ४० ते ५० किमी प्रतितास वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता.
मच्छीमारांसाठी इशारे
कोकण किनारपट्टीवर १६ ते २० ऑगस्टदरम्यान समुद्र खवळलेला राहणार असून वाऱ्याचा वेग ५० ते ६० किमी प्रतितास इतका राहणार आहे. त्यामुळे मच्छीमारांनी या काळात समुद्रात न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सचेत ॲपमार्फत सतर्कता
नागरिकांना आपत्तीपासून सावध करण्यासाठी **‘सचेत ॲप’मार्फत सतत अलर्ट संदेश पाठवले जात आहेत. तसेच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF) यांना आपत्कालीन परिस्थितीसाठी सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
नद्यांची धोक्याची पातळी
रायगड जिल्ह्यातील अंबा नदीने धोका पातळी, तसेच कुंडलीका नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी व कोदवली नदी इशारा पातळीवर पोहोचल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सुरक्षिततेच्या सूचना देत खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
२४x७ आपत्कालीन केंद्र
मंत्रालयीन स्तरावरील आपत्कालीन कार्यकेंद्र २४x७ सुरू असून, नागरिकांनी आवश्यकतेनुसार खालील क्रमांकांवर
संपर्क साधावा
फोन : ०२२-२२०२७९९०, ०२२-२२७९४२२९, ०२२-२२०२३०३९
मोबाइल : ९३२१५८७१४३