
रत्नागिरी प्रतिनिधी
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथे सेवानिवृत्त शिक्षिकेचा राहत्या घरी खून झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी उघडकीस आली. वर्षा वासुदेव जोशी (वय 63) असे मृत महिलेचे नाव असून, चोरीच्या उद्देशाने हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
वर्षा जोशी या एकट्याच घरी राहत होत्या. गुरुवारी (7 ऑगस्ट) त्या आपल्या मैत्रिणीसोबत हैदराबादला फिरायला जाणार होत्या. मात्र, वारंवार फोन करूनही त्या प्रतिसाद देत नसल्याने मैत्रिणीने शेजाऱ्यांशी संपर्क साधला. शेजाऱ्यांनी घराचा दरवाजा उघडला असता, बेडवर हातपाय घट्ट बांधलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच चिपळूण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला.
चोरीचा कोन तपासात
घरातील कपडे अस्ताव्यस्त पडलेले होते. मृतदेहाजवळ मंगळसूत्र व काही दागिने आढळून आले, मात्र इतर दागिने किंवा किमती वस्तू चोरीस गेल्या आहेत का, याचा शोध सुरू आहे. महत्त्वाचे म्हणजे, घरातील सीसीटीव्हीचा डीव्हीआर गायब असल्याने गुन्हेगारांचा शोध अधिक गुंतागुंतीचा झाला आहे.
पतीचे निधन, मूलबाळ नव्हते
पतीचे अकरा वर्षांपूर्वी निधन झाल्यानंतर वर्षा जोशी घरी एकट्याच राहत होत्या. निवृत्तीनंतर त्या शांतपणे आयुष्य जगत होत्या. मात्र, आनंदी क्षण साजरे करण्यासाठी नियोजित प्रवासाआधीच त्यांचे आयुष्य थांबवणारा हा खून घडला.
खूनाचा स्पष्ट अंदाज
जोशी यांच्या अंगावरील कपडे फाटलेल्या स्थितीत होते. चेहऱ्यावर व्रण असल्याचे पोलिसांनी सांगितले. मृत्यूपूर्वी प्रतिकार झाल्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. मागचा दरवाजा उघडा असल्याने चोरीसाठी घुसलेल्या अज्ञात व्यक्तींनीच हा खून केला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, नेमका हेतू आणि आरोपींची ओळख अद्याप समोर आलेली नाही.
या घटनेने चिपळूण शहरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी कसून तपास सुरू केला आहे.