
लोणी काळभोर प्रतिनिधी
“माझा काम धंदा गेला, माझा पैसा पाणी गेला, यांनी माझा वाटला लावला… मी फाशी घेत आहे,” असा व्हिडीओ रेकॉर्ड करून एका कामगाराने आत्महत्या केल्याने लोणी काळभोर परिसरात खळबळ उडाली आहे. इंडियन ऑईल टर्मिनल कंपनीच्या सुपरवायझरसह सहा जणांविरोधात लोणी काळभोर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
आत्महत्या केलेल्या कामगाराचे नाव तुकाराम ज्ञानेश्वर भाले (वय 38, रा. लोणी काळभोर, ता. हवेली) असे आहे. याप्रकरणी त्यांची पत्नी यांनी फिर्याद दिली आहे. आरोपींमध्ये सुनिल विजय कसबे (32), सारिका उर्फ सावित्रा सुनिल कसबे (27), सुनिता विजय कसबे (47), करण काळु कसबे (22, सर्व रा. गारुडीवस्ती, लोणी काळभोर), अक्षय केवट (30) व अजित सिंग (30, रा. कदमवाकवस्ती) यांचा समावेश आहे.
छेडछाड, विनयभंग आणि नोकरीवरून हकालपट्टी
पोलिसांच्या माहितीनुसार, तुकाराम भाले व त्यांची पत्नी हे लोणी काळभोर येथील इंडियन ऑईल टर्मिनलमध्ये कार्यरत होते. दरम्यान, आरोपी अक्षय केवट हा फिर्यादी महिलेला वारंवार अश्लील बोलून, लगट करून विनयभंग करीत होता. या प्रकाराची तक्रार पती-पत्नीने वरिष्ठांकडे केल्यावर, सुपरवायझर अजित सिंग व सुनिल कसबे यांनी फिर्यादीला कामावरून काढून टाकले. तसेच तुकाराम भाले यांनाही नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी देत सतत मानसिक छळ करण्यात आला.
या मानसिक त्रासाला कंटाळून तुकाराम भाले यांनी बुधवारी (ता. 6) रात्री लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या मागील वस्तीत असलेल्या राहत्या घरात लोखंडी अँगलला साडीच्या सहाय्याने गळफास घेतला.
व्हिडीओत केलेली आरोपींची नावानिशी उघड
मृत्यूपूर्वी तुकाराम भाले यांनी मोबाईलवर व्हिडीओ रेकॉर्ड करून करण कसबे, सुनिता कसबे, सारिका कसबे, अजित सिंग यांच्यामुळे आत्महत्या करत असल्याचे सांगितले. त्यात त्यांनी आपला संपूर्ण व्यवसाय, पैसा आणि उपजीविका संपल्याचे नमूद केले.
या प्रकरणी भारतीय न्याय संहितेचे कलम 108, 74, 79, 352, 351(2), 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) स्मिता पाटील करत आहेत.