
नवी दिल्ली | प्रतिनिधी
देशाच्या उपराष्ट्रपतीपदासाठीची निवडणूक अखेर जाहीर करण्यात आली आहे. माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी प्रकृतीच्या कारणास्तव दिलेल्या अचानक राजीनाम्यानंतर या पदावर कोणाची निवड होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, ९ सप्टेंबर रोजी मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाईल. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख २१ ऑगस्ट अशी ठेवण्यात आली आहे.
धनखड यांनी २१ जुलै रोजी रात्री आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. “प्रकृतीच्या कारणास्तव मला हा निर्णय घ्यावा लागत आहे,” असे सांगत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे विशेष आभार मानले होते. त्यांच्या या निर्णयानंतर पंतप्रधान मोदींनी धनखड यांना उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या.
आता देशाच्या दुसऱ्या सर्वोच्च घटनात्मक पदासाठी कोणाची निवड होणार, हे ९ सप्टेंबरच्या मतदानानंतर स्पष्ट होणार आहे.