
सातारा प्रतिनिधी न्यूज नेटवर्क
अहमदाबाद : दहशतवादविरोधी पथक अर्थात गुजरात एटीएसला मोठे यश मिळाले असून, अल-कायदा इन द इंडियन सबकॉन्टिनेंट (AQIS) या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या आरोपाखाली एका महिलेची अटक करण्यात आली आहे. झारखंडची रहिवासी असलेल्या शमा प्रवीण (वय ३०) या महिलेच्या सोशल मीडिया पोस्टद्वारे तिचे पाकिस्तानशी कनेक्शन असल्याचे उघड झाले आहे.
शमाला बंगळुरूच्या हेब्बलमधील मोनारायणपल्या परिसरातील भाड्याच्या घरातून अटक करण्यात आली. ती सध्या आपल्या भावासोबत राहत होती. शमा सोशल मीडियावर दहशतवादी विचारसरणीचा प्रचार करत होती, असे एटीएसने स्पष्ट केले.
गृह मंत्री हर्ष संघवी यांनी सांगितले की, “शमा ही दहशतवाद्यांची सहानुभूतीदर्शक असून, ती सोशल मीडियावर प्रक्षोभक आणि जिहादी सामग्री शेअर करत होती. तिच्या सोशल मीडिया खात्यांवरून ती अल-कायदाशी संबंधित अटकेत असलेल्या लोकांना फॉलो करत होती.”
शमा बेरोजगार असून, तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून दहशतवादाला खतपाणी घालणारे भाषणं आणि पोस्ट शेअर करण्यात येत होत्या. ती लोकांना उघडपणे अशा विचारांना पाठिंबा देण्याचं आवाहन करत होती.
गुजरात एटीएसने शमाला अटक करून स्थानिक न्यायालयात हजर केले आणि ट्रान्झिट वॉरंट मिळवून तिला गुजरातला हलवले आहे. यापूर्वीही एटीएसने एक्यूआयएसच्या चार दहशतवाद्यांना अटक केली होती.
गृह मंत्री संघवी यांच्या मते, “ही महिला केवळ विचाराने नव्हे तर कृतीनेही कट्टर दहशतवादी आहे. तिचे अनेक पाकिस्तानी संपर्क आणि ऑनलाइन नेटवर्क विविध उपकरणांतून हाती लागले आहेत.”
गुजरात एटीएसचा तपास अधिक गतीने सुरू असून, दहशतवाद्यांच्या मॉड्यूलचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे.