
बीड प्रतिनिधी
वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या तरुण डॉक्टरने भुलीचे इंजेक्शन स्वतःच्या शरीरात टोचून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना बीड शहरात उघडकीस आली आहे. ही घटना शनिवारी (ता. २६ जुलै) सायंकाळी समोर आली असून, जिल्हा रुग्णालयात मृतदेह आणल्यानंतर नातेवाईकांचा आक्रोश उपस्थितांचे काळीज पिळवटून टाकणारा होता.
मृत डॉक्टरचे नाव डॉ. संजय सोनाजी ढवळे (वय २९, रा. जुजगव्हाण, ता. बीड) असे असून, तो बीड येथील सोनाजीराव क्षीरसागर होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालयात अंतिम वर्षाचा विद्यार्थी होता. शिवाय शहरातील एका खाजगी रुग्णालयात निवासी वैद्यकीय अधिकारी म्हणूनही तो कार्यरत होता.
खोलीतच घेतले जगाला अलविदा
शनिवारी डॉ. संजय ढवळे यांचा मित्र व नातेवाईकांशी संपर्क होत नसल्याने यशवंतराव चव्हाण नाट्यगृह परिसरातील त्यांच्या भाड्याच्या खोलीच्या दरवाजावर टकटक करण्यात आली. मात्र, प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे दरवाजा तोडण्यात आला असता डॉ. ढवळे यांचा मृतदेह खाटेवर निष्प्राण अवस्थेत आढळून आला.
घटनेनंतर तातडीने शिवाजीनगर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद घेतली असून, उत्तरीय तपासणीनंतर आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक किशोर पवार यांनी सांगितले.
निओव्हेक १० इंजेक्शनमुळे काही मिनिटांत मृत्यू?
मृतदेहाशेजारी ‘निओव्हेक १०’ नावाचे भुलीचे इंजेक्शन सापडले असून, त्यामध्ये व्हेक्युरोनिअम ब्रोमाईड हे घटक आढळून आले आहे. या औषधाचा उपयोग शस्त्रक्रियेपूर्वी किंवा व्हेंटिलेटरवरील रुग्णांना हालचाली थांबवण्यासाठी केला जातो.
“हे औषध फक्त आयसीयू अथवा ऑपरेशन थिएटरमध्ये प्रशिक्षित वैद्यकीय देखरेखीखालीच वापरणे गरजेचे असते. रुग्णालयाबाहेर याचा वापर केल्यास श्वसन बंद होऊन काही मिनिटांत मृत्यू होतो,” अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. हनुमंत पारखे यांनी दिली.
हलाखीच्या परिस्थितीतून डॉक्टर होण्याचा प्रवास
शेतमजूर कुटुंबात जन्मलेल्या डॉ. संजय यांची वैद्यकीय शिक्षणाकडे झेप खडतर प्रवासातून झाली होती. त्यांचे वडील, आई, दोन भाऊ आणि एक अविवाहित बहिण त्यांच्या मागे आहेत. बीड जिल्ह्यातील जुजगव्हाण गावात त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले.
नातेवाईकांचा हुंदका अन् शोकाकुल वातावरण
जिल्हा रुग्णालयात मृतदेह आणल्यानंतर आई, बहिण व भावांचा आक्रोश मन हेलावणारा होता. अनेकांचे अश्रू अनावर झाले. एक होनहार, मेहनती तरुण डॉक्टर असा अचानक निघून गेल्याने वैद्यकीय क्षेत्रातही हळहळ व्यक्त केली जात आहे.
पुढील तपास सुरू
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता शिवाजीनगर पोलिस पुढील तपास करत असून, आत्महत्येचे कारण शोधण्यावर भर दिला जात आहे. सोशल मीडिया आणि कॉलेजमधील मैत्रिणी, सहकारी यांचीही चौकशी केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.