
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगरमध्ये एका किरकोळ वादाने भयंकर वळण घेतले असून, एका मुलीच्या शिक्षणासंदर्भातील वादातून तिच्या आई-वडिलांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. एका खाजगी क्लासमध्ये दोन विद्यार्थिनींमध्ये झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर, एका विद्यार्थिनीच्या पालकांनी दुसऱ्या विद्यार्थिनीच्या आई-वडिलांवर थेट घरात घुसून बेदम मारहाण केली. या हल्ल्यात महिलेवर इतकी अमानुष मारहाण करण्यात आली की, तिला जबर जखमी होईपर्यंत फरशीवर ओढत नेत पायावर नाक घासायला लावले.
ही धक्कादायक घटना संभाजीनगरमधील सातारा परिसरात घडली. याप्रकरणी संदीप श्रीधर शिंदे आणि छाया शिंदे या पती-पत्नींनी सातारा पोलीस ठाण्यात संदीप लंके आणि त्याच्या पत्नीविरोधात गंभीर आरोप करत गुन्हा दाखल केला आहे.
किरकोळ वादातून पेटले संतापाचे लोण
शिंदे दाम्पत्याच्या तक्रारीनुसार, त्यांच्या दोन मुली एका खाजगी शिकवणी वर्गात शिक्षण घेत आहेत. तिथे त्यांच्यापैकी एका मुलीचा दुसऱ्या विद्यार्थिनीशी किरकोळ वाद झाला होता. वर्ग शिक्षकांनी हस्तक्षेप करत हा वाद मिटवला होता. परंतु, काही दिवसांनी त्या मुलीचे वडील संदीप लंके हे थेट शिंदे यांच्या दुकानावर येऊन “तुझ्या मुलीने माझ्या मुलीची माफी मागवून तिला क्लासमध्ये अपमानित केलं, ती कुठे आहे, मला तिला मारायचं आहे,” अशी उन्मत्त भाषा वापरून शिवीगाळ करू लागले.
थेट घरात घुसून दांडक्यांनी हल्ला
तणाव शांत झाल्याचे वाटत असतानाच मंगळवारी लंके पुन्हा आपल्या पत्नी व दोन अनोळखी इसमांसह शिंदे यांच्या घरी थेट घुसले. त्यांच्या हातात दांडे आणि लोखंडी रॉड होते. त्यांनी “तुझी मुलगी कुठे आहे?” असे विचारत आरडाओरडा केला आणि तिथेच संदीप शिंदे यांच्यावर हल्ला चढवला. रॉड आणि दांडक्यांनी त्यांच्या अंगावर सपासप मार सुरु झाला. त्याचवेळी शिंदे यांच्या पत्नी खाली आल्या असता त्यांच्यावरही अत्यंत अमानुषपणे हल्ला करण्यात आला.
महिलेवर क्रूर अत्याचार
शिंदे यांची पत्नी पतीला वाचवण्यासाठी समोर आली असता, संदीप लंकेच्या पत्नीने तिचे केस धरून फरशीवर आपटले. “आता नाक घास आमच्यासमोर,” अशी धमकी देत तिला फरशीवर ओढत नेत जबरदस्तीने आपल्या पायांवर तोंड रगडायला लावलं. ही घटना एखाद्या सिनेमातील प्रसंग वाटावा अशी भयावह होती.
शेजाऱ्यांच्या धाडसामुळे जीव वाचला
घरात चाललेल्या या आरडाओरडाच्या आवाजाने शेजारी धावून आले. एका महिलेने धाडस करत दरवाजा उघडण्यास भाग पाडलं. त्या गोंधळात संदीप शिंदे यांच्या पत्नीने घरातून पळ काढून शेजारच्या घरात आसरा घेतला आणि तिथून पोलिसांना फोन केला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि गुन्हा नोंदवला.
“माझा भाऊ पोलीस आहे, माझं काहीही होणार नाही!”
या सर्व घटनेनंतर संदीप लंकेचा उद्धटपणा आणखी धक्कादायक होता. पोलिसांसमोर उभा राहून तो म्हणाला, “माझं नाव संदीप लंके पाटील आहे. माझा भाऊ पीआय आहे. काय करायचं ते बघा, मला काही होणार नाही!” अशा प्रकारच्या गुन्हेगारांना पाठिशी घालणाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
तपास सुरू आहे.
सातारा पोलीस ठाण्यात संदीप लंके, त्याची पत्नी आणि दोघा अनोळखी इसमांविरोधात गंभीर गुन्ह्यांची नोंद झाली असून, पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. पोलिसांनी नागरिकांना शांत राहण्याचे आणि कोणत्याही अफवांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे.