अमरावती प्रतिनिधी
भारताचे सरन्यायाधीश बी.आर. गवई यांनी निवृत्तीनंतरच्या आयुष्याविषयी मोठा खुलासा करत एक स्पष्ट आणि ठाम भूमिका मांडली आहे. “मी निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद स्वीकारणार नाही,” असं त्यांनी जाहीरपणे सांगितलं आहे. हा निर्णय त्यांनी अमरावती जिल्ह्यातील दारापूर येथे आयोजित सत्कार समारंभात बोलताना जाहीर केला.
गवई यांनी १४ मे २०२५ रोजी भारताचे ५२वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली होती. येत्या नोव्हेंबर महिन्यात ते न्यायसेवेतील त्यांच्या दीर्घ कारकिर्दीला विराम देणार आहेत. मात्र निवृत्तीनंतरही ते कोणतेही पद स्वीकारणार नसल्याचं स्पष्ट करत त्यांनी न्यायालयीन शुचिता आणि नैतिकतेचा आदर्श घालून दिला आहे.
सत्कार समारंभात बोलताना न्यायमूर्ती गवई म्हणाले, “निवृत्तीनंतर मला अधिक वेळ मिळेल. मी तो वेळ दारापूर, अमरावती आणि नागपूरमध्ये अधिक घालवण्याचा प्रयत्न करेन. मी कोणतेही पद स्वीकारणार नाही असा निर्णय माझा ठाम आहे.”
त्यांच्या या वक्तव्याने निवृत्त न्यायमूर्तींनी सरकारी पदे स्वीकारण्याच्या प्रवृत्तीवर अप्रत्यक्षपणे बोट ठेवले आहे. यापूर्वीही त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते की, “सरन्यायाधीशपद भूषवल्यानंतर कोणतीही जबाबदारी स्वीकारणे चुकीचे आहे. अशा कृतीमुळे लोकांचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास डळमळू शकतो.”
त्यांनी सोशल मीडियावरील वावराबद्दलही मत व्यक्त करताना सांगितले की, “मी सोशल मीडिया फॉलो करत नाही. मात्र, न्यायाधीशांनी घरात बसून निर्णय देणे योग्य नाही. त्यांना सामान्य माणसांचे प्रश्न समजून घेणे आवश्यक आहे.”
दारापूर येथे पोहोचल्यावर गावकऱ्यांनी सरन्यायाधीश गवई यांचे जल्लोषात स्वागत केले. यानंतर त्यांनी आपल्या वडिलांच्या, म्हणजेच केरळ आणि बिहारचे माजी राज्यपाल आर.एस. गवई यांच्या स्मृतिस्थळावर पुष्पांजली अर्पण केली. वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला कुटुंबातील सदस्यांसह ते उपस्थित राहिले.
न्यायमूर्ती गवई यांच्या या निर्णयाने न्यायसंस्थेतील पारदर्शकता आणि लोकशाही मूल्यांबद्दलचा त्यांचा कटाक्ष पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. त्यांच्या या भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत आहे.


