
मालेगाव प्रतिनिधी
तालुक्यातील सौंदाणे येथे हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. चारित्र्यावर संशय घेत सासरच्यांनी मानसिक आणि शारीरिक छळ केल्याने एक विवाहित महिला मुलगा आणि मुलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी उघडकीस आली. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून, चार सासरच्यांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृत महिलाचे नाव हर्षाली राहुल अहिरे (वय २८) असून, तिच्यासोबत मुलगा संकेत (५) आणि मुलगी आरोही (७) यांचेही मृतदेह सौंदाणे शिवारातील त्यांच्या शेतातील विहिरीत सापडले. प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, हर्षाली हिला सासरच्या मंडळींकडून सातत्याने संशयाच्या आधारावर छळ सहन करावा लागत होता. वेळोवेळी मारहाण, उपाशी ठेवणे आणि मानसिक त्रास यामुळे ती प्रचंड तणावाखाली होती.
यापूर्वी हर्षालीने महिला समुपदेशन केंद्रात सासरच्या लोकांविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर तडजोडीनंतर ती पुन्हा सासरी परतली होती. मात्र त्रास थांबला नाही आणि अखेर तिने दोन्ही निष्पाप चिमुकल्यांसह आपली जीवनयात्रा संपवली.
या प्रकरणी हर्षालीच्या आई ठगूबाई देवरे (रा. ढाढरे, जि. धुळे) यांनी दिलेल्या तक्रारीवरून तिचा पती राहुल अहिरे, सासू कांताबाई, सासरे दिलीप आणि ननंद सपना यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
या दुर्दैवी घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रीती सावंजी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. दरम्यान, समाजात अजूनही महिलांना चारित्र्याच्या नावाखाली होणारा छळ थांबायचे नाव घेत नाही, हे या घटनेतून पुन्हा अधोरेखित झाले आहे.