
शिराळा, प्रतिनिधी
नागपंचमीचा पारंपरिक आणि धार्मिक उत्सव म्हणून ओळख असलेल्या शिराळा उत्सवावर यंदा कायद्याचे सावट आहे. सण साजरा करताना कायद्याचे उल्लंघन झाल्यास संबंधित नाग मंडळांविरोधात थेट गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी बुधवारी दिला.
शहरातील तहसील कार्यालयात नागपंचमी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपवनसंरक्षक सागर गवते, प्रांताधिकारी सचिन थोरबोले, तहसीलदार श्यामला खोत, पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम तसेच पोलीस व वन विभागाचे अधिकारी, नाग मंडळांचे प्रतिनिधी आणि मान्यवर उपस्थित होते.
“कायदा सर्वात वरचा,” असे स्पष्ट करत अधीक्षक घुगे म्हणाले, “सणाच्या नावाखाली अनुचित प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. डीजेचा आवाज ४५ डेसिबलच्या पुढे गेला, तर संबंधित मंडळावर गुन्हा दाखल केला जाईल. ध्वनीमर्यादा मोजण्यासाठी खास यंत्रणा सज्ज असून, रात्री ८ नंतर कोणतीही ध्वनिवर्धक साधने वापरता येणार नाहीत.”
सर्पमित्रांनी देखील अतिउत्साह टाळावा, असे आवाहन करत त्यांनी सांगितले की, “कोणत्याही साहसी कृतीमुळे स्वतःचे आणि इतरांचे आयुष्य धोक्यात येऊ नये. रस्ते, वीज वाहतूक यांच्यावर अडथळा निर्माण होणार नाही याची खबरदारी घ्या.”
आपत्कालीन सेवा वाहने मोकळ्या मार्गाने जाऊ शकतील याची काळजी घेतली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सीसीटीव्हीची नजर, सोशल मीडियावर बंदी
मिरवणुकीदरम्यान सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत ठेवले जाणार असून, कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्याचा पुरावा म्हणून वापर केला जाणार आहे. सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट किंवा व्हिडिओ टाकल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
स्वागत कमानींना ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ अनिवार्य
मंडळांनी उभारलेल्या स्वागत कमानी सुरक्षित आहेत का, याची खातरजमा करण्यासाठी स्ट्रक्चरल ऑडिट करणे बंधनकारक करण्यात आले आहे. “दुर्घटना टाळण्यासाठी मंडळांनी जबाबदारीने वागावे,” असेही अधीक्षक घुगे यांनी स्पष्ट केले.
या बैठकीत सम्राट शिंदे, श्रीराम नांगरे, रामचंद्र पाटील, सचिन शेटे यांच्यासह विविध मंडळांचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्यांनी नागपंचमीच्या आयोजनासंदर्भात आपली मते मांडली. यावेळी प्रथ्वीसिंग नाईक, प्रमोद नाईक, रणजितसिंह नाईक, जयसिंग गायकवाड, विरेंद्र पाटील, वसंत कांबळे, सतीश सुतार आदी मान्यवरही उपस्थित होते.