
सातारा प्रतिनिधी
चार वर्षांपासून पोलिसांना चकवा देत फरार असलेल्या मारहाण व जबरी चोरीप्रकरणातील मुख्य संशयितास अखेर म्हसवड पोलिसांनी पळशी (ता. माण) येथून अटक केली. रोहिदास शिवाजी जाधव असे अटकेत घेतलेल्या आरोपीचे नाव असून, तो तब्बल चार वर्षांपासून न्यायालयाच्या सुनावणीस गैरहजर राहात होता.
गुन्हा २०१९ मध्ये, न्यायाचा पत्ता नाही!
२०१९ साली रोहिदास जाधव याच्याविरुद्ध म्हसवड पोलिस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याने आपल्या साथीदारांसोबत एका तक्रारदारावर लोखंडी रॉड आणि घातक शस्त्रांद्वारे हल्ला करून त्याची सोन्याची चेन हिसकावून नेली होती. गुन्ह्याचा तपास पूर्ण होऊन दोषारोपपत्र न्यायालयात दाखल झाले होते. मात्र, रोहिदास जाधव हा त्यानंतर न्यायालयात हजरच झाला नाही.
न्यायालयाचा अजामीनपात्र अटक वॉरंट जारी
सुनावणीसाठी वारंवार समन्स बजावूनही तो अनुपस्थित राहिल्याने न्यायालयाने त्याच्याविरुद्ध अजामीनपात्र (नॉन बेलेबल) अटक वॉरंट जारी केले होते. तो गेल्या काही वर्षांपासून फरार असून पोलिसांचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरत होते.
पोलिसांचा गुप्त सापळा यशस्वी
शेवटी म्हसवड पोलिसांनी गुप्त माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे एक सापळा रचला. पळशी गावात रोहिदास जाधव असल्याची खात्री झाल्यावर पोलिसांचे पथक तात्काळ तेथे रवाना झाले आणि अत्यंत शिताफीने त्याला ताब्यात घेतले.
या कारवाईत ‘ही’ टीम ठरली महत्त्वाची
सहायक पोलिस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी भगवान सजगणे, धीरज कवडे, वसीम मुलाणी, राहुल थोरात आणि हर्षदा गडदे यांनी ही कौशल्यपूर्ण कारवाई पार पाडली.
चार वर्षांपासून न्यायापासून पळणाऱ्या आरोपीचा अखेर पर्दाफाश करत, म्हसवड पोलिसांनी आपल्या कार्यक्षमतेचा ठसा पुन्हा एकदा उमठवला आहे.