
सातारा प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार शशिकांत शिंदे यांच्या ल्हासुर्णे येथील निवासस्थानी कोरेगाव पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्याने कोणतीही पूर्वसूचना न देता बेकायदेशीररित्या चौकशी केल्याचा आरोप समोर आला आहे. याच्या निषेधार्थ पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कोरेगाव पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन करत पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांना निवेदन दिले.
हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून, संबंधित कर्मचाऱ्यावर आणि पोलिस ठाण्यावर तत्काळ कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
कार्यकर्त्यांचा संताप अनावर
या प्रकरणाविरोधात पक्षाचे युवा नेते साहिल शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज दुपारी कोरेगाव पोलिस ठाण्यात ठिय्या देत निषेध व्यक्त केला. त्यानंतर पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर करण्यात आले.
या वेळी तालुकाध्यक्ष घनश्याम शिंदे, माजी जिल्हा नियोजन समिती सदस्य संजय पिसाळ, माजी संचालक अरुण माने, माजी सभापती ॲड. पांडुरंग भोसले, नगरपंचायतीतील विरोधी पक्षनेते हेमंत बर्गे, प्रीतम बर्गे, गणेश धनवडे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
सीसीटीव्ही फुटेजमधून पोलिसांची कारवाई उघड
निवेदनात म्हटले आहे, की एका गुन्ह्याच्या चौकशीच्या नावाखाली कोरेगाव पोलिस ठाण्यातील एका कर्मचाऱ्याने कोणतीही अधिकृत कल्पना न देता आमदार शिंदे यांच्या निवासस्थानी प्रवेश केला. हा प्रकार लोकप्रतिनिधीच्या स्वातंत्र्यावर घाला असून, राजकीय सूडबुद्धीने प्रेरित आहे. चौकशीची ही पद्धत एखाद्या पक्षाच्या कार्यकर्त्यासारखी होती, असा आरोपही करण्यात आला आहे.
सोमवारी मोठा मोर्चा; आमदार शिंदे स्वतः उपस्थित
या पार्श्वभूमीवर आमदार शशिकांत शिंदे यांनी तीव्र संताप व्यक्त करत, ‘‘कोरेगाव पोलिस यंत्रणा राजकीय पक्षाच्या दबावाखाली कार्यरत आहे. संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई न झाल्यास, सोमवारी मोठ्या मोर्चाचे आयोजन करण्यात येणार असून मी स्वतः त्यात सहभागी होईन,’’ असा इशारा दिला आहे.
पक्षीय कार्यकर्त्यांमध्ये संतापाचे वातावरण असून, पोलिसांच्या एकतर्फी कारवाईला विरोध करत लढा तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला जात आहे.