
मिरा-भाईंदर प्रतिनिधी
मराठी अस्मिता आणि भाषेच्या मुद्द्यावर मनसेने पुकारलेल्या मोर्चामुळे मिरा-भाईंदर परिसरात खळबळ उडाली आहे. मोर्चासाठी मनसेने बालाजी हॉटेलपासून मीरारोड स्टेशनपर्यंत मार्ग निश्चित केला होता. मात्र, पोलिसांनी परवानगी नाकारताच वातावरण चिघळले. शनिवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना ताब्यात घेतले, तर वसई-विरारमधील अनेक पदाधिकाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.
या पार्श्वभूमीवर मनसेच्या कार्यकर्त्यांनी मोर्चासाठी निर्धार कायम ठेवत मीरारोड परिसरात मोठ्या संख्येने गर्दी केली. पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली असून परिस्थिती तणावपूर्ण झाली आहे.
दरम्यान, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी परिस्थिती स्पष्ट करत मोठे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, “ज्या मार्गावर मोर्चा काढायचा होता, तिथे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. आम्ही त्यांना जागा बदलण्याचा सल्ला दिला आहे. जर त्यांनी जागा बदलली, तर आम्ही लगेच परवानगी देऊ. अजूनही त्यांना परवानगी देण्यास आम्ही तयार आहोत. परंतु कोर्टाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन आम्हाला करावे लागते.”
कदम पुढे म्हणाले की, “त्या भागात पूर्वी व्यापाऱ्यांनीही मोर्चा काढला होता आणि त्यांनाही परवानगी नव्हती. त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल केले गेले आहेत. कायदा-सुव्यवस्थेचं रक्षण करणं हे आमचं कर्तव्य आहे.”
दरम्यान, या साऱ्या कारवाईवरुन शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री प्रताप सरनाईक यांनी पोलिसांवर कडाडून टीका केली. “पोलिसांची भूमिका अत्यंत चुकीची आहे. त्यांनी एखाद्या पक्षासाठी काम करू नये. व्यापाऱ्यांना मोर्चा काढू दिला, मग मराठी एकीकरणासाठी निघालेल्या मोर्चाला का थांबवलं? गृहखात्याचे स्पष्ट आदेश नसताना पोलिसांनी कुणाच्या सांगण्यावरून ही धरपकड केली, हे तपासण्याची गरज आहे,” असे सरनाईक म्हणाले.
त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी याबाबत चर्चा करणार असल्याचेही स्पष्ट केले. “मी पोलीस आयुक्तांशी नाराजी व्यक्त केली आहे. मीरारोडमध्ये सध्या जे सुरू आहे ते अत्यंत चुकीचं आहे,” असे म्हणत सरनाईक यांनी शासनाची भूमिकाच प्रश्नचिन्हात आणली.
मोर्चा, परवानगी आणि कारवाई यावरून महायुती सरकार अडचणीत? मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा एकदा केंद्रस्थानी.