
मीरा भाईंदर प्रतिनिधी
मराठी अस्मितेसाठी मीरा-भाईंदरमध्ये उभारण्यात आलेल्या मोर्चामध्ये सोमवारी एक वेगळंच नाट्य घडलं. मराठी एकीकरण समिती, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी संयोजन केलेल्या या मोर्चात शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक सहभागी झाले, मात्र उपस्थित आंदोलकांनी त्यांना जोरदार विरोध करत “५० खोके एकदम ओके”, “सरनाईक गो बॅक” अशा घोषणांनी जोरदार धडक दिली.
मोर्चासाठी आधी परवानगी नाकारण्यात आली होती. त्यावरून संतप्त झालेल्या प्रताप सरनाईक यांनी पोलिस प्रशासनावर थेट टीका करत, “मी स्वतः मोर्चात सहभागी होतोय, हिंमत असेल तर अडवा,” असं आव्हानच दिलं होतं. मात्र प्रत्यक्षात आंदोलकांचा रोष त्यांच्याच विरोधात वळल्याने त्यांना काही क्षणांतच माघारी फिरावं लागलं.
आंदोलकांनी ‘जय गुजरात’च्या घोषणा देत सरनाईक यांच्यावर विश्वासघात केल्याचा आरोप केला. त्यांच्यावर ‘सरनाईक गो बॅक’चा जयघोष सुरू होताच पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. काही काळासाठी वातावरण चिघळल्याने तणाव निर्माण झाला.
या प्रकारामुळे शिंदे गटाला मराठी अस्मितेच्या आंदोलनात स्थान नाही, असा स्पष्ट संदेश आंदोलकांनी दिला. प्रत्यक्षात मराठीसाठी लढण्याचा दावा करणाऱ्या नेत्यांनाच जनतेच्या रोषाचा सामना करावा लागल्याने राज्याच्या राजकारणात नवा रंग भरला आहे.