
स्वप्नील गाडे| रिपोर्टर
मिरा रोड परिसरात तंत्रमंत्र आणि गुप्तधन काढून पतीचे व्यसन सोडवण्याचे आमिष दाखवून लाखोंची फसवणूक करणाऱ्या एका भोंदूबाबाला काशिगाव पोलिसांनी अटक केली आहे. अयोध्याप्रसाद गिरी असं खोटं नाव सांगून स्वतःला महाराज म्हणून ओळख देणाऱ्या या व्यक्तीने एका महिलेचा विश्वास संपादन करून २ लाख ७० हजार रुपये आणि सोनं उकळलं.
तक्रारदार रुपाली निराटकर या महिलेला “तुमच्या पतीवर जिन लागलाय, आठ दिवसांत तो मरेल,” अशी भीती दाखवली. पूजा करण्याच्या बहाण्याने त्यांच्याकडून २.७० लाख रुपये आणि ८४ ग्रॅम सोन्याचे दागिने घेतले. “४५ दिवसांनी डबा उघडा,” असं बजावलं. मात्र संशय आल्यावर डबा उघडला असता तो रिकामा निघाला.
तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरू केला. आरोपीला तुर्भे, नवी मुंबई येथून अटक करण्यात आली. त्याचे खरे नाव सुनिलकुमार पातीदास ऊर्फ अयोध्याप्रसाद (वय ४८) असल्याचे निष्पन्न झाले असून, तो यापूर्वीही मुंबई, नवी मुंबई, ठाणे परिसरात अशा प्रकारची फसवणूक करत असल्याचे उघड झाले आहे.
आरोपीकडून ९४ हजार रुपये रोख, १२ ग्रॅम सोनं, काळे कपडे आणि पूजा साहित्य हस्तगत करण्यात आले आहे. पुढील तपास सुरू आहे.
ही कामगिरी पोलिस उपायुक्त प्रकाश गायकवाड, सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. विजय मराठे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश तोगरवाड, पोलिस निरीक्षक (गुन्हे) संजय पुजारी, पोलिस उपनिरीक्षक अभिजीत लांडे आणि राणा परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
तपास पथकात पोलीस हवालदार प्रताप पांचुदे, पोलीस हवालदार सचिन पाटील, पोलीस शिपाई विक्रांत खंदारे, उमंग चौधरी, किरण विरकर, टोबर, रविंद्र सोनावणे, नामदेव देवकाते आणि पोलीस शिपाई/अभिषेक मढावी यांचा समावेश होता.
पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय पुजारी करत आहेत.