
मुंबई प्रतिनिधी
राज्यातील सर्वसामान्य नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी. फडणवीस सरकारने सर्वप्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी लागणारे ५०० चे मुद्रांक शुल्क रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत शुक्रवारी हा निर्णय अधिकृतरित्या जाहीर केला.
जात पडताळणी, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र अशा विविध शासकीय प्रमाणपत्रांसाठी आतापर्यंत नागरिकांना पाचशे रुपयांचा स्टॅम्प पेपर वापरून प्रतिज्ञापत्र सादर करावे लागत होते. मात्र, या निर्णयामुळे आता केवळ साध्या कागदावर अर्ज करून संबंधित प्रमाणपत्रे थेट तहसील कार्यालयातून मिळवता येणार आहेत.
महसूलवाढीसाठी मागील सरकारने हे शुल्क १०० वरून थेट ५०० पर्यंत वाढवले होते. याचा सर्वाधिक फटका विद्यार्थ्यांना बसत होता. त्यामुळे यावर विद्यार्थ्यांसह पालकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात होती. या पार्श्वभूमीवर महसूलमंत्र्यांनी विधानसभेत हा निर्णय मागे घेत शुल्क पूर्णतः माफ केल्याचे स्पष्ट केले.
या निर्णयाची अंमलबजावणी तात्काळ करण्यात येणार असून, सभागृहात याबाबत निवेदन सादर करण्यात आले आहे. नागरिकांनी या निर्णयाचे उत्स्फूर्त स्वागत केले असून, विद्यार्थ्यांच्या आर्थिक भारात मोठी घट होणार आहे.
राज्य शासनाच्या या पावलामुळे विविध प्रमाणपत्रांच्या प्रक्रियेत सुलभता येणार असून, सामान्य जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे.