मुंबई प्रतिनिधी
महाराष्ट्र, भारतातील एक अग्रगण्य राज्य, केवळ आर्थिकदृष्ट्या नव्हे तर शिक्षण, पर्यटन, कृषी, उद्योग व सहकार क्षेत्रात देखील देशात आघाडीवर आहे. भारताची तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होण्याच्या वाटेवर असताना, महाराष्ट्रदेखील लवकरच “ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी” होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.
राज्याचा व्याप वाढत असताना, प्रशासकीय सोईसाठी मोठ्या जिल्ह्यांचे विभाजन करून नवे जिल्हे तयार करण्याची मागणी गेल्या काही वर्षांपासून होत आहे. पुणे, नाशिक, औरंगाबाद (अहिल्यानगर) यांच्यासह अनेक मोठ्या जिल्ह्यांच्या विभाजनाची मागणी जनतेकडून सातत्याने होत आहे.
राज्य सरकारने देखील यावर गांभीर्याने विचार करत, एक महत्त्वपूर्ण प्रस्ताव तयार केला होता. या प्रस्तावात २२ नवीन जिल्ह्यांची निर्मिती करण्याचा विचार करण्यात आला होता. मात्र सध्या हा प्रस्ताव अद्यापही शासनाच्या फाईलमध्येच अडकून पडला आहे.
महाराष्ट्रातील सध्याचा नवीनतम जिल्हा कोणता?
राज्यात सध्या एकूण ३६ जिल्हे व ३५८ तालुके असून हे सर्व जिल्हे सहा महसूल विभागांमध्ये विभागले गेले आहेत – कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद (मराठवाडा), अमरावती आणि नागपूर.
या जिल्ह्यांमध्ये सध्या पालघर हा महाराष्ट्रातील सर्वात नवीन जिल्हा आहे.
पालघर जिल्ह्याची निर्मिती १ ऑगस्ट २०१४ रोजी ठाणे जिल्ह्याच्या विभाजनातून करण्यात आली. ठाण्याच्या पश्चिम भागातील काही तालुक्यांना वेगळे करून स्वतंत्र पालघर जिल्हा तयार करण्यात आला.
पालघर जिल्ह्याची थोडक्यात माहिती:
कोकण विभागातील हा जिल्हा मुंबई महानगर प्रदेशाचा (MMR) भाग आहे.
मुंबईपासून फक्त ८७ किमी अंतरावर, तर विरारपासून केवळ ३५ किमी अंतरावर हे शहर आहे.
पालघर शहर हे जिल्ह्याचे मुख्यालय असून हे मुंबई-अहमदाबाद महामार्गाच्या पश्चिमेस वसले आहे.
पालघर जिल्ह्यात एकूण ८ तालुके आहेत – पालघर, डहाणू, वसई, वाडा, विक्रमगड, तलासरी, मोखाडा आणि जव्हार.
इतिहासात पाहिल्यास, 1942 च्या ‘भारत छोडो आंदोलनात’ पालघरचा विशेष सहभाग होता. येथील क्रांतिकारकांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध ठामपणे लढा दिला होता. त्यामुळे हे क्षेत्र स्वातंत्र्य संग्रामातील ऐतिहासिक योगदानासाठीही ओळखले जाते.
काय पुढे नवे जिल्हे निर्माण होतील?
राज्यातील अनेक भागांमध्ये नव्या जिल्ह्यांची मागणी वाढतच आहे. प्रशासनिक दृष्टिकोनातून नागरिकांना सुविधा जवळ मिळाव्यात, या हेतूने सरकारने २२ नवीन जिल्ह्यांचा विचार केलेला असला तरी, प्रत्यक्षात अजून कोणताही नविन जिल्हा अस्तित्वात आलेला नाही.
पालघरनंतर पुढचा जिल्हा कधी आणि कुठे निर्माण होणार? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल!


