
अलिबाग प्रतिनिधी
मुंबईतील एका नामांकित कंपनीतील महिला कर्मचाऱ्यावर अलिबागमध्ये ऑफिस पार्टीदरम्यान दारूच्या नशेत सहकाऱ्याने जबरदस्ती केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकरणी कंपनीतील सेल्स एक्झिक्युटिव्ह अभिषेक सावडेकर (वय २५, रा. कोपरखैरणे, वाशी, नवी मुंबई, ठाणे) याच्याविरोधात अलिबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही धक्कादायक घटना ३० जूनच्या रात्री अलिबाग तालुक्यातील मुशेत येथील अलास्का व्हिला या बंगल्यात घडली. मुंबईतील कंपनीचे एकूण १४ अधिकारी आणि कर्मचारी ऑफिस पार्टीसाठी मांडवा येथे आले होते. पगाराच्या महिनाअखेरचे बिल तयार करण्याचे काम पीडित महिलेला दिले गेले होते. हे काम रात्री साडेआठ वाजता पूर्ण करून तीही पार्टीमध्ये सहभागी झाली.
पार्टीदरम्यान सर्वजण मद्यपानात व्यस्त होते. त्याच दरम्यान मद्यपान केल्यानंतर पीडित महिला जलतरण तलावाजवळ झोपली. काही वेळाने सहकाऱ्यांनी तिला उचलून व्हिलाच्या एका खोलीत झोपवले. मात्र, पहाटे साडेतीनच्या सुमारास तिची झोप अचानक उडाली आणि तिला आपल्या शरीरावर कुणीतरी जबरदस्ती करत असल्याची जाणीव झाली.
पीडित महिलेने डोळे उघडून पाहिले असता अभिषेक सावडेकर हा खोलीतून बाहेर जाताना दिसला. त्यानंतर तिच्या लक्षात आले की, नशेचा फायदा घेत सावडेकरने तिच्यावर बलात्कार केला. रुमच्या बाहेर असलेले आयुष ठक्कर आणि जसपाल सिंग यांच्याकडे तिने तात्काळ विचारणा केली. मात्र, त्यांनी काहीही माहिती नसल्याचे सांगितले.
सकाळी अभिषेक सावडेकरला विचारणा केली असता त्याने गुन्ह्याची कबुली देत पीडित महिलेकडे माफी मागितली. या घटनेमुळे पीडित महिला मानसिक तणावात आली आणि तिने थेट विरार गाठले. तिने काही वेळाने अलिबाग पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 64 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा तपास अलिबाग पोलिस ठाण्याच्या प्रभारी पोलिस निरीक्षक किशोर साळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सहायक पोलिस निरीक्षक सरिता मुसळे करीत आहेत.
पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून, पार्टीदरम्यान उपस्थित राहिलेल्या इतर कर्मचाऱ्यांचीही चौकशी करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.