
बीड प्रतिनिधी
राजकारणाच्या गल्लीपासून दिल्लीपर्यंत प्रभाव गाजवणाऱ्या वाल्मिक कराड यांच्यावर खळबळजनक आरोपांचा भडिमार झाला आहे. कराडचे जुने सहकारी विजयसिंह उर्फ बाळा बांगर यांनी थेट पत्रकार परिषदेत उघडपणे सांगितलं की, “माझ्यासमोर तीन खून झाले, त्यात महादेव मुंडेंनाही मारण्यात आलं. मारल्यानंतर त्याचं कातडं, हाडं आणि रक्त कराडच्या टेबलावर ठेवण्यात आलं!”
या खुलाशांमुळे जिल्हा राजकारणात प्रचंड खळबळ उडाली आहे. ‘वाल्मिक कराडने मारेकऱ्यांना शाबासकी दिली आणि त्यांना गाड्या गिफ्ट केल्या’, असा धक्कादायक आरोप करत बांगर यांनी म्हणाले की, ‘‘संतोष देशमुख यांच्या हत्येपूर्वीच मला फोन करून, तुला एका सरपंचाच्या खुनात अडकवणार, अशी थेट धमकी कराडने दिली होती.’’
जुन्या सहकाऱ्याचं टोकाचं वक्तव्य
बांगर यांनी सांगितलं, ‘‘वाल्मिक कराडपासून दूर झाल्यानंतर त्याने पुन्हा माझ्यासोबत काम करण्याचा हट्ट धरला. मी नकार दिला तेव्हापासून आमच्यात वाद सुरू झाले. आज या पत्रकार परिषदेत मी अनेक पुरावे सादर केले आहेत. हे सर्व मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पोलीस अधीक्षकांकडे देणार आहे.’’
कॉल रेकॉर्डिंगनं उडवली खळबळ
पत्रकार परिषदेत बांगर यांनी एक कॉल रेकॉर्डिंगदेखील सार्वजनिक केलं. त्यात कराड एका व्यक्तीला “सगळ्यांची मदत घेतो, तू कोण रे कुत्रा?” अशा अपशब्दात बोलताना ऐकू येतो. शिवाय जातीय शिवीगाळही करण्यात आली असल्याचं यातून स्पष्ट झालं.
बांगर यांनी यावेळी दावा केला की, ‘‘सदर व्यक्तीने कामासाठी कराडकडे २५ लाख रुपये दिले होते. मात्र कराडने पैसे परत न देता, उलट त्या व्यक्तीला बोलावून पाच लाख रुपये दिले आणि उरलेल्या रकमेवरून त्याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला.’’
‘‘असाच प्रकार माझ्यासोबतही झाला. मलादेखील खंडणीच्या गुन्ह्यात अडकवण्यात आलं. या सगळ्या प्रकरणामागे वाल्मिक कराडचं षड्यंत्र आहे,’’ असा आरोप करत बांगर यांनी याप्रकरणात चौकशीची मागणी केली आहे.
आता काय होणार?
या आरोपांमुळे कराड यांच्या राजकीय कारकिर्दीवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. आरोपांची गंभीरता पाहता, राज्य सरकार आणि पोलिस यंत्रणा काय भूमिका घेणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.