
बीड प्रतिनिधी
गेवराई तालुक्यातील खळेगावात बुधवारी रात्री एक हृदयद्रावक घटना घडली. मुलीच्या लग्नासाठी ठेवीचे पैसे मिळावेत म्हणून सतत बँकेच्या फेऱ्या मारणाऱ्या एका वडिलाने अखेर थेट बँकेच्या गेटलाच गळफास लावून जीवन संपवलं. छत्रपती मल्टीस्टेट बँकेच्या गेटवर ही धक्कादायक घटना उघडकीस आली आणि संपूर्ण परिसर हादरून गेला.
सुरेश आत्माराम जाधव (वय अंदाजे ५५) असे आत्महत्या केलेल्या ठेवीदाराचे नाव असून, त्यांनी छत्रपती मल्टीस्टेट बँकेत तब्बल ११ लाख आणि ज्ञानराधा मल्टीस्टेटमध्ये ५ लाख रुपये ठेवले होते. ही रक्कम त्यांना मुलीच्या लग्नासाठी हवी होती. मात्र, अनेकदा चकरा मारूनही आणि विनवण्या करूनही बँक व्यवस्थापनाने त्यांना पैसे परत दिले नाहीत. यामुळे वैतागून आणि हतबल होऊन त्यांनी रात्री आपल्या कुटुंबासह बँकेपाशी जाण्याचा निर्णय घेतला. काही वेळातच त्यांनी बँकेच्या गेटवरच गळफास घेत आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले.
मल्टीस्टेट बँकांवरील विश्वासार्हतेचा फेरविचार
या घटनेनंतर परिसरात प्रचंड संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे. एका बापाने मुलीच्या डोहाळेजेवणाऐवजी अंत्यसंस्काराची तयारी करावी, ही या व्यवस्थेची शोकांतिका आहे. सततच्या ठेवी अडकण्याच्या घटनांमुळे मल्टीस्टेट बँकांची कार्यपद्धती, पारदर्शकता आणि विश्वासार्हतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.
प्रशासन गप्प… जबाबदार कोण?
सुरेश जाधव यांच्यासारखे अनेक ठेवीदार महिन्यानमहिने आपल्या रकमा मिळाव्यात म्हणून हेलपाटे खात आहेत. मात्र, त्यांचं दु:ख ऐकायला ना बँकेचं व्यवस्थापन तयार आहे ना सरकार. ही आत्महत्या नसून व्यवस्थेच्या गलथान कारभारामुळे झालेला “आर्थिक खून” असल्याची भावना ग्रामस्थ आणि ठेवीदार व्यक्त करत आहेत. आता प्रशासन, सहकार विभाग आणि राज्य सरकार यावर काय कारवाई करते, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.