
इस्लामपूर प्रतिनिधी
राज्यातील वैद्यकीय क्षेत्राला हादरवणारी एक धक्कादायक घटना वाळवा तालुक्यात समोर आली आहे. मुंबईतील एका नामांकित इस्पितळात कार्यरत असलेल्या महिला डॉक्टरने स्वतःवर ब्लेडने वार करत आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. पती-पत्नी दोघेही डॉक्टर असून, कौटुंबिक वादातून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.
मृत डॉक्टरचे नाव डॉ. शुभांगी समीर वानखडे (वय ४४, राहणार- ईएसआयएस हॉस्पिटल क्वार्टर्स, एल.बी.एस. मार्ग, मुलुंड पश्चिम, मुंबई) असे आहे. त्यांचा पतीदेखील सरकारी वैद्यकीय अधिकारी असल्याची माहिती आहे.
घटना कशी घडली?
मिळालेल्या माहितीनुसार, शुभांगी वानखडे या त्यांच्या चारचाकी वाहनाने (MH 03 AR 1896) पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करत होत्या. विठ्ठलवाडी फाटा परिसरात, पांढरा वडाजवळ त्यांनी गाडी थांबवली आणि तिथेच ब्लेडने स्वतःच्या गळा व डाव्या हातावरील नसा कापून घेतल्या. त्यानंतर त्या गाडीतच मागच्या सीटवर बेशुद्धावस्थेत आढळल्या.
स्थानिक नागरिकांनी या प्रकाराची माहिती दिल्यानंतर त्यांना तत्काळ इस्लामपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रक्तस्त्राव अत्यंत गंभीर झाल्यामुळे रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
कौटुंबिक वाद कारणीभूत?
प्राथमिक चौकशीत शुभांगी यांच्या आत्महत्येमागे कौटुंबिक वाद असल्याचे स्पष्ट होत आहे. त्या सकाळी “रुग्णालयात जात आहे” असे सांगून घरातून बाहेर पडल्या होत्या. मात्र रात्री उशिरा त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले.
या प्रकरणी इस्लामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून, सहायक पोलिस फौजदार संदेश यादव यांनी फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.
वैद्यकीय वर्तुळात शोककळा
या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात शोककळा पसरली आहे. समाजात आरोग्य सेवा देणाऱ्या डॉक्टरनेच आपल्या आयुष्याचा अंत असा दुर्दैवी मार्गाने केल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
पुढील तपासासाठी पोलिस मृत महिलेच्या नातेवाईकांची व पतीची चौकशी करत असून, मृत्यूमागील नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.