मुंबई प्रतिनिधी
राज्याच्या प्रशासकीय पातळीवर मोठा बदल करत महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजेश कुमार यांनी सोमवारी महाराष्ट्राचे नवीन मुख्य सचिव म्हणून पदभार स्वीकारला. मंत्रालयात पार पडलेल्या एका साध्या पण औपचारिक समारंभात त्यांनी मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्याकडून सूत्रे स्वीकारली. या वेळी शासनाच्या विविध विभागांचे सचिव उपस्थित होते.
राज्यसेवेतील ३७ वर्षांची यशस्वी कारकीर्द पूर्ण करून सुजाता सौनिक आज निवृत्त झाल्या. त्यांच्या उत्तराधिकारीपदासाठी आय.एस. चहल, भूषण गगराणी यांसारख्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे चर्चेत होती. मात्र, ज्येष्ठतेच्या निकषावर राजेश कुमार यांच्या नावावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिक्कामोर्तब केले.
राजेश कुमार हे १९८८ बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस) अधिकारी असून मूळचे राजस्थानातील सवाई माधोपूर येथील आहेत. इतिहास विषयात पदव्युत्तर पदवी घेतल्यानंतर त्यांनी सोलापूर जिल्ह्यात सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून प्रशासकीय कारकीर्दीची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, धाराशिव व जळगाव जिल्हाधिकारी, सोलापूर महापालिका आयुक्त, आदिवासी विकास आयुक्त यासह अनेक महत्त्वपूर्ण पदांवर काम केले आहे. उद्योग, ग्रामविकास व सहकार विभागात अप्पर मुख्य सचिव म्हणून त्यांच्या कार्यकाळाची विशेष नोंद घेण्यात आली.
राजेश कुमार यांना मुख्य सचिवपदासाठी केवळ दोनच महिने मिळणार असून, येत्या ऑगस्टमध्ये ते नियमानुसार निवृत्त होणार आहेत. मात्र या दोन महिन्यांत प्रशासनाचा गाडा अधिक गतिमान करण्याचे आव्हान त्यांच्या समोर असेल.


