
मुंबई प्रतिनिधी
जुलैचा पहिला दिवस नागरिकांसाठी अनेक नव्या नियमांची सुरुवात घेऊन आला आहे. करदात्यांपासून ते प्रवाशांपर्यंत सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणाऱ्या ११ महत्त्वपूर्ण बदलांची अंमलबजावणी आजपासून देशभरात सुरू झाली आहे. केंद्र सरकार, बँका आणि विविध संस्थांनी लागू केलेले हे नियम आपल्या खिशावर थेट परिणाम करणारे ठरणार आहेत.
१. नवीन पॅनसाठी आधार अनिवार्य, लिंकिंगसाठी ३१ डिसेंबर अंतिम मुदत
CBDT ने जारी केलेल्या आदेशानुसार, १ जुलैपासून नवीन पॅन कार्डसाठी आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. आधीच पॅन आणि आधार असलेल्या नागरिकांनी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत दोन्ही लिंक करणे बंधनकारक आहे.
२. रेल्वे तिकीटांचे दर वाढले, प्रवास महागला
रेल्वेने मेल व एक्सप्रेस गाड्यांच्या भाड्यात वाढ केली असून नॉन-एसी प्रवासासाठी प्रति किमी १ पैसा, तर एसीसाठी २ पैसे वाढवले आहेत. ५०० किमीपर्यंतच्या सेकंड क्लास आणि मासिक पासमध्ये बदल नाही.
३. तत्काळ तिकिट बुकिंग आता केवळ आधार-प्रमाणित वापरकर्त्यांसाठीच
IRCTC द्वारे तत्काळ बुकिंग करण्यासाठी आता आधारशी जोडलेला मोबाईल क्रमांक आवश्यक आहे. OTP प्रमाणीकरणाशिवाय बुकिंग शक्य होणार नाही.
४. रेल्वे चार्ट आता प्रवासाच्या ८ तास आधी तयार होणार
पूर्वी चार्ट प्रवासाच्या ४ तास आधी तयार होत असे. आता ती वेळ दुपटीने वाढवून ८ तासांवर नेण्यात आली आहे. तत्काळ बुकिंगवेळी आधार डिटेल्स देणे बंधनकारक आहे.
५. HDFC क्रेडिट कार्डधारकांवर अतिरिक्त शुल्काचा भार
युटिलिटी बिल पेमेंट, डिजिटल वॉलेट ट्रान्सफर (१०,००० रुपयांवर) आणि गेमिंग अॅपवरील खर्चावर १% अतिरिक्त शुल्क आकारले जाणार आहे.
६. ICICI बँकेच्या ATM व्यवहारांवर वाढलेले शुल्क
मेट्रो शहरांतील पाच मोफत व्यवहारांनंतर आणि नॉन-मेट्रोतील तीन व्यवहारांनंतर ATM मधून रोख रक्कम काढण्यासाठी २३ रुपये शुल्क आकारले जाईल. IMPS व्यवहारांवरही टप्प्याटप्प्याने शुल्क निश्चित करण्यात आले आहे.
७. दिल्लीतील जुन्या वाहनांना इंधन नाकारले जाणार
१० वर्षांहून जुन्या डिझेल व १५ वर्षांहून जुन्या पेट्रोल गाड्यांना १ जुलैपासून पेट्रोल पंपांवर इंधन दिले जाणार नाही.
८. UPI चार्जबॅक प्रक्रियेत बदल – बँकांना स्वायत्तता
आता UPI व्यवहारांवरील चार्जबॅक दावे NPCI ची परवानगी न घेता थेट बँकांद्वारे हाताळता येणार आहेत. परिणामी, पैसे परत मिळवण्याची प्रक्रिया जलद होणार आहे.
९. GST रिटर्न फॉर्ममध्ये संपादनाची सुविधा बंद
GSTR-3B फॉर्ममध्ये दुरुस्ती करण्याची मुभा आता बंद करण्यात आली आहे. तसेच, तीन वर्षांनंतर मागील तारखेचा GST रिटर्न भरता येणार नाही.
१०. व्यावसायिक गॅस सिलेंडर ५८.५ रुपयांनी स्वस्त
ऑइल कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतीत घट केली आहे. घरगुती सिलेंडरच्या किमती मात्र कायम आहेत.
११. एसटीच्या आगाऊ आरक्षणावर १५% सवलत
१५० किमीहून अधिक प्रवासासाठी एसटीच्या आगाऊ आरक्षणावर आता १५% सूट दिली जाणार आहे. ही योजना वर्षभर (सणासुदीचा काळ वगळून) लागू राहणार आहे.
या नियमांमधून काही ठिकाणी सामान्य नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी, अनेक बाबतींत खर्चवाढ होणार आहे. त्यामुळे आर्थिक नियोजन करताना या बदलांचा विचार करणे अत्यावश्यक ठरेल.