
भिवंडी,सातारा प्रतिनिधी न्युज नेटवर्क
बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश करून भिवंडीमध्ये वास्तव्य करणाऱ्या सहा बांगलादेशी महिलांना ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली.
भिवंडीमध्ये बेकायदेशीरपणे बांगलादेशी महिला वास्तव्यास असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे, पोलिसांच्या पथकाने हनुमान टेकडी परिसरातून सहा बांगलादेशी महिलांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांच्याकडे पारपत्र आढळून आले नाही.
या सर्व महिलांनी त्या बेकायदेशीरपणे भारतात आल्याचे कबूल केले. येथील भाड्याच्या घरामध्ये त्या वास्तव्य करत होत्या. या महिलांविरोधात पोलिसांनी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याविरोधात पारपत्र अधिनियम १९२० चे कलम ३,४, परकीय नागरिकांचा कायदा १९४६ चे कलम १३, १४-अ (ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.