
गडचिरोली प्रतिनिधी
जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेल्या तेलंगणाच्या हद्दीतील मेडीगड्डा धरणाजवळ असलेल्या गोदावरी नदीच्या पात्रात सहा मुलं बुडाल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली.
महाराष्ट्राचा शेवटचा तालुका सिरोंचा तालुक्याच्या सीमेवरून गोदावरी नदी वाहते.दोन राज्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या या नदीच्या पलीकडे तेलंगणाच्या हद्दीत मेडीगड्डा धरणाजवळ असलेल्या गोदावरी नदीच्या पात्रात आंघोळीसाठी आज संध्याकाळी गेलेली 6 मुलं बुडाली आहेत. अद्याप त्यांचा शोध लागलेला नाही, रात्री उशिरापर्यंत शोध मोहीम सुरू होती. मात्र, ही मुले अद्यापही सापडली नाहीत. घटनेची माहिती मिळताच मुलांच्या कुटुंबातील सदस्यांनी व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.
तेलंगणा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मच्छीमारांची मदत घेऊन तेलंगणा पोलिसांकडून बुडालेल्या मुलांचा शोध घेतला जात आहे. शोधमोहीम राबविण्यात येत असून उद्या सकाळपर्यंत या संदर्भात सर्वोतोपरी माहिती निष्पन्न होण्याची शक्यता आहे.
दरम्यान या दुर्घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी नदीकिनारी धाव घेतली असून आक्रोश पाहून अनेकांचे डोळे पाणावले. सध्या पावसाळा सुरू झाल्याने नद्यांना मोठं पाणी आलं असून नद्या भरुन वाहत आहेत. गोदावरी नदीला वाहतं पाणी असल्याने या पाण्यात मुले वाहून गेल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. दरम्यान, उद्या सकाळी पुन्हा शोधमोहिम सुरू केली जाईल.