
येवला प्रतिनिधी
आज येवल्यात महाराष्ट्र राज्य उत्पादक शुल्क विभागाच्या भरारी पथकाने कारवाई करत कोट्यावधी रुपयाची अवैद्य दारू जप्त करून एक आरोपीला ताब्यात घेतले आहे. सदर गुन्ह्यात वाहनासह एक कोटी एकवीस लाख ५३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दारूची चोरटी वाहतूक करण्यासाठी जी अक्कल लढवण्यात आली ती मात्र सर्वांना अचंबित करणारी आहे. अवैध दारूची चोरटी वाहतूक करण्यासाठी चक्क टँकरचा वापर करण्यात आला. या तीन कप्प्यात एकूण व्हिस्की दारूचे ११०० बॉक्स असून बाजारात वाहनसह या सर्वांची किंमत अंदाजे एक कोटी एकवीस लाख त्रेपन्न हजार इतकी आहे.
उत्पादक शुल्क विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, मनमाड कोपरगाव महामार्गावर असलेल्या टोलनाक्यावर टँकर क्र RJ 27 GB 6586 अडवून चौकशी केली असता शासनाचा महसूल बुडवून परराज्यातून व्हिस्की दारू आणली जात असल्याचे आढळून आले.
सदरची कारवाई नाशिक राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संतोष झगडे उपाधीक्षक रवींद्र उगले, निरीक्षक रियाज खान यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक आर व्ही चव्हाण व त्यांच्या पथकाने केली.
येवला येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात पकडलेला मुद्देमाल जमा करण्यात आला आहे. एकीकडे अवैध प्रकार थांबवण्यासाठी प्रशासन कारवाई करत असले तरी दुसरीकडे मात्र अवैध व्यावसायिक अशा प्रकारच्या क्लूप्त्या लढवतांना दिसताय. यामुळे या अवैध व्यवसायामागे अंतराज्यीय टोळी सक्रिय आहे का या दिशेने शोध घेतला जात आहे.