
मुंबई प्रतिनिधी
महाराष्ट्रातआज विविध अपघातांनी हादरला आहे. राज्यात विविध ठिकाणी झालेल्या अपघातात 11 लोक ठार झाले आहेत. तर 4 जण जखमी झाले आहेत. अकोला, बीड, सोलापूर, जालना आणि भंडारा आदी ठिकाणी हे अपघात झाले.
एका ठिकाणी कार पुलावरून कोसळल्याने कारमधील प्रवाशांना जीव गमवावा लागला तर एका ठिकाणी चालकाला डुलकी लागल्याने प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या घटनांचे पंचनामे करण्यात आले असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
अकोल्यात तिघे दगावले
अकोला जिल्हात मध्यरात्रीच्या सुमारास चारचाकी वाहनाचा भीषण अपघात झाला. हा अपघात अत्यंत भीषण होता. अकोला जिल्ह्यातील वाडेगाव बाळापूर रस्त्यावर हा अपघात झाला. रात्रीचा अंधार असल्याने चालकाला अंदाज आला नाही. त्यामुळे कार थेट नदीवरील पुलाचे कठडे तोडत पुलाखाली कोसळली. त्यामुळे अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर एकजण गंभीर जखमी आहे. कन्हैय्यासिंग ठाकूर (वय 54), विशाल भानुदास सोलनकर (वय 45) आणि सुनील शर्मा (वय 45) असं मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे आहेत. आशिष कन्हैय्यासिंग ठाकूर हा गंभीर जखमी आहे. त्याच्यावर अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातात मरण पावलेले सर्वजण बाळापूरचे राहणारे आहेत.
हा अपघात अत्यंत भीषण असल्याचं सांगितलं जात आहे. पुलाचे कठडे तोडून कार थेट खाली कोसळली. खाली कोसळल्यानंतरही कार 5-6 वेळा पलटी झाली. त्यामुले कारमधील प्रवाशांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचं सूत्रांनी सांगितलं. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून बाळापूर शहर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
बीडमध्ये चारजण ठार
बीड जिल्ह्यात अत्यंत भीषण अपघात झाला. एका भरधाव टेम्पोने रिक्षाला जोरदार धडक दिल्याने अपघातात चौघांचा मृत्यू झाला असून दोनजण गंभीर जखमी झाले आहेत. माजलगाव तालुक्यातील नित्रूड परिसरात तेलगाव-माजलगाव रस्त्यावर रात्री 11.30 वाजता हा भीषण अपघात झाला. आयशर टेम्पोने रिक्षाला धडक देऊन 50 ते 60 फुटांपर्यंत फरफटत नेले. त्यामुळे चौघांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये सिरसाळा येथील फारूक चाँद सय्यद, शबाना फारूक, शेख नोहिद एजाज आणि फैजान रफिक सय्यद यांचा समावेश आहे. आयशर टेम्पो चालक घटनास्थळावरून पसार झाला. दिंद्रुड पोलिसांनी रात्रीच घटनास्थळी धाव घेऊन पुढील कार्यवाही सुरू केली.
भंडाऱ्यात दोघांनी जीव गमावला
भंडाऱ्याच्या राष्ट्रीय महामार्ग क्र. 53 वर देवरीकडुन साकोलीकडे जात असलेल्या दुचाकीला भरधाव टाटा मॅजिक वाहनाच्या चालकाने धडक दिली. या अपघातात मोटारसायलस्वारासह दोघांचा जागीच मृत्यू झाला. भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील उकारा फाट्यावर ही घटना घडली. जितेंद्र रविंद्र उपराळे (वय 28 वर्षे, राहाणार मोहनटोला, ता.आमगाव, जि. गोंदिया) आणि यादोराव गोपाल वघारे (वय 36, रा.आमगाव,जि. गोंदिया) या दोघांचा या अपघातात मृत्यू झाला आहे.
ड्रायव्हरला डुलकी लागली, एकाचा मृत्यू
जालना येथे सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर वडीगोद्री परिसरात कार आणि ट्रकचा भीषण अपघात झालाय. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू तर दुसरा एक जण गंभीर जखमी झाला आहे. कार चालकाला डूलकी लागल्याने कार दुभाजक ओलांडून थेट विरुद्ध साईटला असणाऱ्या ट्रकवर जाऊन आदळली. हैदराबादकडून शिर्डीकडे देवदर्शनासाठी ही कार जात होती. त्यावेळी हा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की, कार भरधाव वेगात ट्रकला जाऊन धडकताच कारचा अक्षरशः चक्काचूर झाला.
सोलापुरात चिमुकल्याचा मृत्यू
सोलापुरात दुचाकीने धडक दिल्याने एका चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आजीसोबत चालत जात असताना दुचाकीने धडक दिल्याने या 6 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. शिवांशू ऊर्फ बंटू लक्ष्मीनारायण बोद्धूल असे मृत चिमुकल्याचे नाव आहे. 31 मे रोजी दुपारी सोलापुरातल्या गेंट्याल चौक ते शास्त्री नगर रस्त्यावर हा अपघात झाला. जखमी अपघातानंतर शिवांशूला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याच्यावर उपचार सुरू होते. पण रात्री त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी एका अज्ञात महिला दुचाकी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.