सोलापूर प्रतिनिधी
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात खेलो इंडिया आणि विद्यापीठ विकास फंडातून २० कोटी रुपयांचे इनडोअर स्टेडिअम उभारले जात आहे. देशातील तिसरे आणि महाराष्ट्रातील पहिले सर्वात मोठे ते स्टेडिअम असणार आहे.
४० बाय ६० मीटर अशा आकाराच्या या स्टेडिअममध्ये १५ पेक्षा जास्त खेळ खेळले जाऊ शकतात.
सोलापूर जिल्ह्यात कुस्ती, बॅडमिंटन, बास्केट बॉल, हॉलीबॉल, टेनिस बॉल, खोखो, कबड्डी, फेन्सिंग, योगा, कराटे, रेसलिंग, ज्युडो, तायक्वांदो, चेस, हॅण्डबॉल असे खेळ खेळणाऱ्या खेळाडूंची संख्या मोठी आहे. त्यांच्यासाठी आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील इनडोअर स्टेडिअममध्ये आंतरमहाविद्यालयीन, विद्यापीठस्तर, विभागीय, राज्य व आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा होतील. १५ जुलैपर्यंत काम पूर्ण होईल, असे सध्याचे नियोजन असून त्यादृष्टीने स्टेडिअमचे काम सुरू आहे.
१ ऑगस्ट रोजी विद्यापीठाचा वर्धापन दिन असून त्या दिवशी पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे स्मारक, विद्यापीठाची प्रशासकीय इमारत व या इनडोअर स्टेडिअमचा लोकार्पण सोहळा घेण्याचे नियोजित आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण देण्यात आले आहे. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकार्पणाचा सोहळा पार पडेल, असे विद्यापीठाकडून सांगण्यात आले.
स्टेडिअममध्ये असणार खेळाडूंसाठी अत्याधुनिक प्रशिक्षण केंद्र
महाराष्ट्रातील सर्वात मोठे इनडोअर स्टेडिअमची उभारणी आपल्या विद्यापीठाकडून होत आहे. केंद्र सरकारच्या खेलो इंडियाचा हा प्रोजेक्ट आहे. भविष्यात कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर, प्र कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याचे क्रीडा खाते व केंद्र सरकारचे स्पोर्ट्स ॲथोरिटी ऑफ इंडियासोबत सामंजस्य करार करून या ठिकाणी सेंटर ऑफ एक्सलन्स (अत्याधुनिक प्रशिक्षण केंद्र) सुरू करण्यात येईल. सोलापुरात कुस्ती प्रसिद्ध असून येथील खेळाडूंना निवासी प्रशिक्षण देण्याची सोय करता येईल. याशिवाय अन्य खेळाडूंनाही प्रसिद्ध प्रशिक्षकांमार्फत अत्याधुनिक प्रशिक्षणही देता येईल.
– डॉ. अतुल लकडे, कुलसचिव, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ
इनडोअर स्टेडिअमची वैशिष्ट्ये…
२० कोटींचा खर्च, ४० बाय ६० मीटरचा आकार
एकाचवेळी १०० खेळाडू राहू शकतात
स्टेडिअमध्ये दोन मजली मेस असणार आहे
हेल्थ सेंटर, योगा, मलखांब रुम, जीम, पंचांची राहण्याची सोय
प्रेक्षक क्षमता १००० पेक्षा जास्त आहे


