सोलापूर प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे जेष्ठ नेते, अक्कलकोटचे माजी आमदार आणि माजी गृहराज्यमंत्री सिद्धराम म्हेत्रे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यामुळे सोलापुरात काँग्रेस गटात हालचालींना वेग आला आहे.
सिद्धराम म्हेत्रे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. ३१ मे रोजी म्हेत्रे कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
मागील अनेक वर्षांपासून सिद्धराम म्हेत्रे आणि म्हेत्रे घराणे काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ होते. पण त्यांनी काँग्रेसचा हात सोडून शिवसेनेची साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या ३१ मे रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत म्हेत्रे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यासह शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
आज सोलापुरातील रेवणसिद्धेश्वर सांस्कृतिक भवनामध्ये बैठक घेत सिद्धराम म्हेत्रे यांनी शक्तीप्रदर्शन केले. शिवसेना जिल्हा प्रमुख महेश साठे यांच्या उपस्थितीत म्हेत्रे यांच्या शिवसेना प्रवेशाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. सिद्धराम म्हेत्रे हे सोलापूरमधील काँग्रेसचे जेष्ठ नेते होते. त्यांच्या शिवसेना प्रवेशामुळे सोलापूर जिल्ह्यात काँग्रेसला मोठे खिंडार पडले आहे.


