
मुंबई प्रतिनिधी
बोरिवली पश्चिम येथील ओम प्रथमेश इमारतीत शनिवारी सकाळी कार पार्किंगसाठी वापरली जाणारी लिफ्ट कोसळून एकाचा मृत्यू झाला, तर एकजण गंभीर जखमी झाला.
२१ मजली इमारतीतील ही लिफ्ट तब्बल ७ मीटर खोल खड्ड्यात कोसळली. लिफ्टमध्ये अडकलेले दोघांना अग्निशमन दलाने बाहेर काढले. त्यानंतर त्यांना बीडीबीए शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र शुभम धुरी (३०) याला मृत घोषित करण्यात आले. तर सुजित यादव (४५) याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे रुग्णालयाने सांगितले.
लिफ्ट कोसळण्यामागचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. लिफ्टच्या देखभालीसंबंधी कोणतीही दुर्लक्ष झालं असल्यास संबंधितांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, अशाच प्रकारची एक घटना विक्रोळी परिसरातही घडली. गणेश मैदानात झाड कोसळून २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. सध्याच्या हवामानात सुरक्षिततेच्या दृष्टीने नागरिकांनी अधिक खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनाने केलं आहे.