
मुंबई प्रतिनिधी
श्री सिद्धिविनायक मंदिर न्यास, प्रभादेवी यांच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी एक सुखद बातमी जाहीर करण्यात आली आहे. मंदिर न्यासाच्यावतीने चालविण्यात येणाऱ्या ग्रंथालयात (लायब्ररी) नव्याने पुस्तकांचा मोठा संग्रह उपलब्ध करून देण्यात आला आहे. ही सुविधा २९ मे २०२५ पासून विद्यार्थ्यांसाठी खुली करण्यात आली आहे.
या उपक्रमांतर्गत स्पर्धा परीक्षा, विविध शैक्षणिक अभ्यासक्रम तसेच ज्ञानवर्धक वाचनासाठी उपयुक्त असलेल्या पुस्तकांचा समावेश करण्यात आला आहे. अभ्यासासाठी लागणाऱ्या शैक्षणिक साहित्याची कमतरता भासू नये यासाठी न्यासाने विशेष प्रयत्न केले असून, विद्यार्थ्यांना एकाग्रतेने अभ्यास करता यावा यासाठी शांत आणि सुसज्ज वातावरणही निर्माण करण्यात आले आहे.
या उपक्रमाबद्दल बोलताना न्यासाचे विश्वस्त जितेंद्र राऊत यांनी सांगितले की, “शिक्षण हेच विद्यार्थ्यांचे भविष्य घडवते. त्यासाठी आवश्यक सर्व संसाधनं मंदिर न्यासातर्फे उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे.”
विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि आपल्या शैक्षणिक प्रवासात याचा सकारात्मक उपयोग करावा, असे आवाहन राऊत यांनी केले आहे.