
सातारा प्रतिनिधी
आगामी आषाढी एकादशी यात्रा, पालखी सोहळ्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांनी पाणी, स्वच्छता, शौचालये, वारकऱ्यांसाठी आरोग्य व्यवस्था, औषधसाठा आदींची उत्कृष्ट व्यवस्था करावी. तसेच पालखी सोहळा प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांच्या सूचनांचा सकारात्मक विचार करून आवश्यक कामे तातडीने करावीत, अशा सूचना पुणे महसूल विभागाच्या अतिरिक्त आयुक्त कविता द्विवेदी यांनी केल्या.
पुण्याच्या विधानभवनात आयोजित आषाढी एकादशी यात्रा पालखी सोहळा पूर्वतयारी आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी पिंपरी चिंचवडचे अतिरिक्त पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, पुणे पोलीस आयुक्तालयाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, अपर आयुक्त महेश पाटील उपस्तित होते. तर दूरदृष्य प्रणालीद्वारे सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, कोल्हापूरचे विशेष पोलीस महानिरीक्षक शशिकांत महावरकर, सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील, सोलापूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार जोशी, सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आदी तसेच विविध पालखी सोहळ्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
यंदा पावसाचे प्रमाण पाहता पालखीला जास्त गर्दी होण्याची शक्यता असल्याचे सांगून श्रीमती द्विवेदी म्हणाल्या, ”एकत्रित नियंत्रण कक्ष समन्वयाने सुरू राहील, सर्व अधिकारी परस्परांच्या संपर्कात राहतील असे नियोजन करावे. पालखी सोहळ्याला होणारी अपेक्षित गर्दी लक्षात घेऊन पोलीस यंत्रणेने पालखी मार्गावर गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही आणि ड्रोन कॅमेऱ्यांचा उपयोग करावा. आवश्यक तेथे निरीक्षण मनोरे उभे करावेत. साखळी चोरीच्या (चेन स्नॅचिंग) घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस यंत्रणेने आवश्यक ते मनुष्यबळ पुरवावे. पार्किंगची व्यवस्था पुरेशी असेल याकडे लक्ष द्यावे.”
गेल्या काही दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे मुख्य मार्गांच्या दुरुस्तीबरोबरच पालखी मार्गाला जोडल्या जाणाऱ्या कच्च्या रस्त्यांची दुरुस्ती करणे, रस्त्यांची कामे सुरू असलेल्या ठिकाणचा रस्त्यावरील राडारोडा काढणे, मुरुमीकरण करणे आदी उपाययोजना कराव्यात, अशा सूचना त्यांनी केल्या.
काटेकोर नियोजन करा
यंदा मोबाईल स्वच्छतागृहांची संख्या वाढविण्यात आली असून त्यांच्या स्वच्छतेसाठी पुरेसे कर्मचारी नेमावेत. त्यांची जेट स्प्रे द्वारे नियमित स्वच्छता व्हावी. त्या ठिकाणी पाण्याचे टँकर सतत उपलब्ध असतील याची दक्षता घ्यावी. स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याचे टँकर, नियंत्रणकक्ष, भोजनव्यवस्था आदी सोयी- सुविधांची माहिती वारकऱ्यांना व्हावी यासाठी दिशादर्शक फलक लावण्यात यावेत. पालखी काळात वाहतुकीसाठी रस्ते बंद केल्यास पर्यायी रस्त्यांची माहिती जनतेपर्यंत प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून जाईल असे नियोजन करावे, आदी सूचना त्यांनी दिल्या.
सोहळ्यासाठी सातारा जिल्हा प्रशासन सज्ज
यावेळी पुणे, सातारा, सोलापूर जिल्हा प्रशासन, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पोलीस प्रशासनाच्यावतीने करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती देण्यात आली. सातारा जिल्हाधिकारी पाटील यांनी सांगितले. खासगी कुटुंबांनी वारकऱ्यांसाठी आपली शौचालये वापरास देण्याची इच्छा दर्शवली आहे. अशा घरांवर पांढरे झेंडे लावून पालखी सोहळ्यात माहिती देण्यात येणार आहे. रस्ते दुरुस्ती, फिरत्या शौचालयांची दुरुस्ती, पाण्याचे टँकरची व्यवस्था आदी माहितीही त्यांनी दिली.