
सातारा प्रतिनिधी
सातारा |दहिवडी, ता. येथील किराणा दुकान फोडून सुमारे ८२ हजार ५०० रुपयांची रोकड लंपास करणाऱ्या चोरट्यांना दहिवडी पोलिसांनी केवळ २४ तासांत जेरबंद करत मोठे यश मिळवले आहे. अटक करण्यात आलेल्या संशयितांकडून २२ हजार ५०० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.
अभिजित कालिदास पवार (वय २६) आणि आदित्य कालिदास पवार (वय १९, दोघे रा. वेटणे, ता. खटाव) अशी अटकेत असलेल्या संशयितांची नावे आहेत. दिनांक २४ मे रोजी मध्यरात्री दहिवडी येथील एका किराणा दुकानाचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोख रक्कम लांबवली होती. घटनेनंतर दहिवडी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत केवळ २४ तासांत या गुन्ह्याचा छडा लावत दोन्ही संशयितांना अटक केली.
ही कारवाई सपोनि दत्तात्रय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गुलाब दोलताडे, पोलिस हवालदार वावरे, बापू खांडेकर, पोलिस नाईक नितीन धुमाळ, महिला पोलिस नाईक रासकर, पोलिस कॉन्स्टेबल निलेश कुदळे, महेंद्र खाडे व गणेश खाडे यांच्या पथकाने केली. संशयितांना पुसेगाव परिसरातून अटक करण्यात आली.
दोन्ही संशयितांविरुद्ध यापूर्वीही सातारा, वडूज, पुसेगाव पोलिस ठाण्यांत विविध गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिस अधिक तपास करत असून उर्वरित रक्कम व इतर चोरीच्या घटना उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.